महापालिका क्षेत्रामध्ये करोना रुग्ण संख्या वाढत असली तरी सद्यस्थितीत शहरात टाळेबंदी लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. पण, करोना नियमाचे नागरिकांकडून पालन होत नसेल आणि अशीच रुग्ण संख्या वाढत राहिली तर नागपूरप्रमाणेच शहरात टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २५० ते ३०० नवे करोना रुग्ण आढळून येत असून बुधवारी दिवसभरात शहरामध्ये पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शहरात करोना रुग्ण वाढत असले तरी सद्यस्थितीत शहरात टाळेबंदी लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. पण, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही आणि रुग्ण संख्या वाढतच राहिली तर केवळ निर्बंध करून चालणार नाही. त्यासाठी नागपूरप्रमाणे टाळेबंदीच करावी लागेल, असा इशारा आयुक्त शर्मा त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून आढळून येत असलेल्या एकूण रुग्णांमध्ये जोखमीच्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. तर, लक्षणे दिसून येत नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९० टक्के आहे. त्यामुळे अनेकजण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. नव्या नियमावलीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अशा रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात येणार असून त्याचबरोबर १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याबाबतचा माहिती फलक त्यांच्या घरावर लावण्यात येणार आहे. याशिवाय, करोनाबाधित रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्काही मारला जाणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. शहरात करोनावरील उपचारासाठी रुग्णालयात पुरेशा खाटा आहेत. रुग्णवाहिकेची व्यवस्था आणि औषधांचा साठाही उपलब्ध आहे.
‘ती’ वेळ येऊ देऊ नका…
कोणताही व्यवसाय तसेच आस्थापना बंद करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका नाही आणि तशी इच्छाही नाही. पण, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाले तर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये करोनाची साथ संपत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील. त्यामुळे आस्थापना टाळेबंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.
