ठाणे/मुंबई : महायुतीतील जागावाटपाचा तिढा आता आणखी वाढू लागला असून यात शिवसेना-शिंदे गटाची मोठी कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या भाजपने ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा आपल्याला मिळावी, असा आग्रह धरला आहे.

शिवसेनेचा विद्यमान खासदार असलेली नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी तर दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्यास शिंदे यांनी तयारी दर्शवली असली तरी ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासून भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरवण्याची तयारी चालवली होती. २०१९च्या युतीतील जागावाटपानुसार ही जागा शिवसेनेकडे असल्याने येथून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, असा शिंदे गटाचा आग्रह होता. त्यामुळे आतापर्यंत या जागेवरील उमेदवाराची घोषणा होत नव्हती. मात्र, आता भाजपने ही जागा शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ- वाशिममध्ये महायुतीच्या उमेदवारीचा संभ्रम कायम

या बदल्यात ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ सोडा, अशी अटच शिंदे गटापुढे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अटीमुळे शिंदे गटाची पंचाईत झाली आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून एकेकाळी भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या ताब्यात आणला होता. ही जागा भाजपला दिल्यास त्यातून शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शिंदे यांना भीती आहे. तर शिंदे यांचे पुत्र श्रीकांत हे कल्याणचे खासदार आहे. त्यामुळे ती जाग सोडणेही त्रासदायक आहे. या अटीमुळे कात्रीत सापडलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी ही कोंडी फोडण्यासाठी थेट भाजप पक्षश्रेष्ठींनाच साकडे घातल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले असताना विमानतळावर शिंदे यांनी त्यांच्याकडे याबाबत विनंती केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, नाशिक येथे उमेदवारीसाठी ठाण मांडून बसलेले विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनाही डावलले जाण्याची शक्यता आहे. तेथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. धाराशीवमधूनही अजित पवार गटाचाच उमेदवार राहील, अशी सूत्रांची माहिती आहे.