जयेश सामंत, भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाडाव करायचा असेल तर कळव्यापासून अंबरनाथ, दुर्गाडी पर्यंत पसरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील तीन-चार लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या आगरी मतांच्या ध्रुवीकरण करायचे असा बेत आखत निवडणुक प्रचारात आगरी कार्ड चालविण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरल्याचे गुरुवारी निकालानंतर दिसून आले.

कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या २७ गावांच्या परिसरात सत्ताधारी शिवसेना-भाजप विरोधात नाराजीचा सूर होता. ही गावे वगळली जावीत यासाठी संघर्ष समितीचे नेते कमालीचे आक्रमक होते. या गावातील मतदारांनी मात्र संघर्ष समितीलाही वाकुल्या दाखविल्याचे स्पष्ट होत असून बाबाजी पाटील यांच्या देसले-पडले गावातही शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास नकार दिल्यामुळे येथून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक लढवावी असा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह होता. मात्र, आव्हाडांनी हा आग्रह अव्हेरला आणि येथून राष्ट्रवादीने नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला. माजी मंत्री गणेश नाईक यांनी येथून जिल्हा बँकेचे माजी संचालक बाबाजी पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरताच आव्हाडांनीही मग सुटकेचा श्वास सोडला.

बाबाजी हे आगरी समाजातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी महिला बचत गटाची साखळी तयार केली आहे. त्यामुळे नाईकांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरताच पक्ष नेतृत्वानेही तो मान्य केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा ते अंबरनाथ पट्टय़ात ११० पेक्षा अधिक गावे आहेत. कळवा, खारेगाव, कल्याण, २७ गावे तसेच अंबरनाथ, दुर्गाडी पट्टय़ातील या गावांमध्ये आगरी समाजातील मतदारांची संख्या मोठी आहे. या आगरी मतांचे ध्रुवीकरण करत शिंदे यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचे बेत राष्ट्रवादीने आखले होते. गणेश नाईक यांनीही या मतदारसंघातील आपल्या जुन्या नातेसंबंधांना उजाळा देत याच मार्गावरून मोर्चेबांधणी सुरू केली होती. २७ गावांमधील संघर्ष समितीही या काळात आक्रमक झाली होती. ही गावे महापालिकेतून वगळावीत यासाठी समितीचे नेते आग्रही आहेत. शिवसेना आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे मात्र त्यास तयार नाहीत. त्यामुळे शिंदे पुत्राला धडा शिकवू अशी गर्जना या गावांमधील ठरावीक नेते करताना दिसत होते. बाबाजी यांनीही काही नेत्यांना पंखाखाली घेत आगरी कार्ड चालविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात मात्र २७ गावांसह खुद्द बाबाजी यांच्या देसले, पडले गावातही दे यांना मोठी आघाडी मिळाली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election result 2019 no polarization of agri votes in thane
First published on: 24-05-2019 at 03:15 IST