scorecardresearch

बचतकर्ते नव्हे गुंतवणूकदार व्हा!

‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ वार्षिकांक प्रकाशित

(संग्रहित छायाचित्र)
‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ वार्षिकांक प्रकाशित * तज्ज्ञ अर्थनियोजनकारांचा ठाणेकरांना सल्ला

ठाणे : कर आणि महागाईवर मात करणाऱ्या आकर्षक परताव्याच्या गुंतवणुकीसाठी स्वत:च्या अभ्यासाबरोबरच संयम, जोखीम घेण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे आर्थिक सुनियोजन करावे, असा सल्ला बुधवारी येथे देण्यात आला. गुंतवणूकदारांनी अल्प संतुष्टीच्या मराठी बाण्यापल्याड व्यावसायिक दृष्टिकोन बाळगायला हवा; केवळ बचतकर्ते नव्हे तर गुंतवणूकदार व्हावे, असा मूलमंत्रही आर्थिक नियोजनातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी दिला.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ वार्षिषांकाचे प्रकाशन ‘टिप टॉप प्लाझा’त झाले. गुंतवणूकपर मार्गदर्शनाच्या या सहाव्या वार्षिकांकाच्या प्रकाशननिमित्तप्रसंगी तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसनही केले. एलआयसी, बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी एचएफएल व मिराडोर असलेल्या या पॉवर्ड बाय कार्यक्रमात सुनील वालावलकर यांनी संवाद साधला.

सनदी लेखापाल प्रशांत चौबळ यांनी या वेळी गुंतवणुकीचे महत्त्व विशद करताना गुंतवणुकीला स्वत:च्या आयुष्यात आरोग्याविषयी जेवढे स्थान देतो तेवढेच गुंतवणुकीबाबत देण्यावर भर दिला. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना संबंधित बाजारपेठ, गुंतवणूक पर्यायाच्या अभ्यासाबरोबरच वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून गुंतवणूक करण्याबाबत नमूद केले. वाढती महागाई, वाढते आयुर्मान, वाढती बेरोजगारी लक्षात घेत गुंतवणूकदारांनी वित्तीय व्यवस्थापन करणे गरजेचे असून आपल्या बचतीवर परिणाम करणाऱ्या देशी, विदेशी घटनांबाबतही सजग राहण्याविषयी सांगितले.

भांडवली बाजारातील गुंतवणुकीबाबतचे नियोजन विस्तृत करताना बाजार विश्लेषक व ‘अर्थ वृत्तांत’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे यांनी कंपन्यांचे समभाग, त्यांचे मूल्य, परतावा, नफा आदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन या वेळी नमूद केले. जोखीम स्वीकारण्याची तयारी तसेच संयम हे गुण गुंतवणुकीतून दीर्घकालीन लाभ मिळवून देतात, असेही ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांमध्ये काही क्षेत्र, समभागांमध्ये नकारात्मकता दिसल्याच्या कारणांचे विवेचन करताना वाळिंबे यांनी या वेळी आगामी कालावधीत कोणत्या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यावे हेही स्पष्ट केले.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’चे अमित मांजरेकर यांनी सांगितले की, आपल्या सभोवताली सल्ला देणारे अनेक असताना विश्वासू सल्लागाराला आपले ध्येय, गरजा स्पष्ट करून स्वत:ही गुंतवणुकीबाबत माहिती ठेवावी.

नेहमी मिळकतदार होण्यापेक्षा गुंतवणूकदार बनणे केव्हाही आवश्यक ठरते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वत:चे आर्थिक नियोजन दरवर्षी करावे, असा सल्लाही मांजरेकर यांनी या वेळी दिला.

गुंतवणुकीच्या अर्थपूर्णतेसाठी..

अंतरिम अर्थसंकल्पावर आधारित तसेच एकूणच व्यक्तिगत गुंतवणुकीच्या प्रत्येक अंगावर प्रकाश टाकणारे ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ हे वार्षिकांक आता उपलब्ध झाले आहे. निवडक ठिकाणी ते विक्रीकरिता आहे. भांडवली बाजार, वायदे बाजार, म्युच्युअल फंड, मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता, निवृत्तिवेतन, कर, विमा आदी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचे सविस्तर विवेचन यात आहे.

दादरकरांसाठी सोमवारी संधी

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या पुनप्र्रकाशनाच्या निमित्ताने गुंतवणूकपर मार्गदर्शनाची संधी दादरकरांनाही उपलब्ध होत आहे. तज्ज्ञ आर्थिक नियोजनकारांद्वारे गुंतवणूक शंकेचे निरसन यानिमित्ताने करून घेता येणार आहे. सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे हा कार्यक्रम होईल.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta arth brahma yearly issue released

ताज्या बातम्या