सागरी किनारच्या नऊ राज्यांतील खाद्य संस्कृतीची माहिती देणारा विशेषांक
ठाणे : भारतातील विविध खाद्यपदार्थाच्या चवींची ओळख जगप्रसिद्ध आहे. या सर्वामध्ये वैशिष्टय़पूर्ण ठरणाऱ्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यावरील विविध राज्यांच्या पाककलेची चर्चा लोकसत्ता आयोजित पूर्णब्रह्म या कार्यक्रमात गुरुवारी झाली. या वेळी लोकसत्ता पूर्णब्रह्म या सहाव्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
नऊ राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाचा परिचय ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषकांत करून दिला आहे. गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील खाद्यसंस्कृतीची वैशिष्टय़े पूर्णब्रह्म विशेषांकात स्पष्ट करण्यात आली आहेत. तसेच या सर्व राज्यांतील पाककृतींची विस्तृत माहिती वाचकांना या विशेषांकात वाचण्यास मिळणार आहे. यंदाचे या विशेषांकाचे सहावे वर्ष असून दर वर्षी विशेषांकाच्या माध्यमातून वेगवेगळी खाद्यसंस्कृती वाचकांच्या भेटीसाठी आणली जाते. या विशेषांकाच्या माध्यमातून सागरी किनारच्या राज्यातील खाद्यसंस्कृतीची पुरेपूर माहिती वाचकांना या विशेषांकात वाचायला मिळेल अशी माहिती चतुरंग पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांनी दिली.
या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांना नारळाचा कोणताही एक गोड पदार्थ घरून बनवून आणून सादर करायचा होता. ११० हून अधिक आबालवृद्धांनी
या स्पर्धेत सहभाग घेऊन नारळापासून बनवलेली पाककला सादर केली होती. या स्पर्धेचे परीक्षण अर्चना आर्ते, राधा जोगळेकर आणि चारुशीला धर यांनी केले.
उपस्थितांच्या भरघोस प्रतिसादात ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा प्रकाशन सोहळा आणि पाककला स्पर्धा पार पडली. या वेळी अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
खाणे हा महत्त्वाचा संस्कार – संकर्षण कऱ्हाडे
ताण दूर करण्यासाठी जीवनात खाण्यावर नितांत प्रेम असावे. भारतातील खाद्यपदार्थाची एक वेगळी ओळख जगात आहे. ही ओळख म्हणजे येथील खाद्यपदार्थामध्ये वापरले जाणारे मसाले. इंग्रजांनाही त्यांची भुरळ पडली होती. भारताची खाद्य परंपरा मसाल्यांमुळे जपली गेली आहे. खाणे हा १४ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो.
स्वयंपाक करणाराही कलाकारच- अभिजीत खांडकेकर
जेवणात आणि स्वयंपाकात खूप प्रेम आहे. पाककला अवगत असणाराही कलाकार असतो. आपला जन्म हा खाण्यासाठीच झाला आहे असे मला वाटते. आयुष्यात सुदृढ राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व केवळ १० ते २० टक्केच आहे इतर गोष्टी या पूर्णपणे खाण्यावर अवलंबून असतात.
प्रायोजक : तन्वी हर्बल,
सह प्रायोजक श्री धूतपापेश्वर, बँकिंग पार्टनर अपना बँक, पॉवर्ड बाय किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंद कुमार, हेल्थकेअर पार्टनर होरायझन हॉस्पिटल.