जुन्या ठाण्यात सर्वसामान्यांना सापत्न वागणूक

समूह विकास योजनेद्वारे झोपडपट्टीधारकांना तसेच नव्या गृहनिर्माण धोरणात म्हाडा इमारतींना अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर करणाऱ्या शासनाने ठाणे शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्बाधणीबाबत मात्र कमालीची उदासीनता दाखवली आहे. शहरात सुमारे बाराशे ते दीड हजार अधिकृत धोकादायक इमारती आहेत. त्यातील अनेक इमारती मोडकळीस आल्याने खाली करण्यात आल्या असून त्यात राहणारी शेकडो कुटुंबे सध्या विस्थापित झाली आहेत. मात्र या भग्न इमारतींच्या तळमजल्यावर असलेली दुकाने मात्र पूर्ववत सुरू आहेत. गोखले रोड आणि राम मारुती रोड येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करून निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना न दुखाविण्याचे धोरण अवलंबणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हीच संवेदनशीलता भाडेकरूंबाबत का दाखवली नाही, असा सवाल जुने ठाणेकर विचारीत आहेत.

गोखले रोडवरील देवधर रुग्णालयाजवळील इमारतीचा भाग काही महिन्यांपूर्वी कोसळला. त्यानंतर त्वरित ती इमारत धोकादायक ठरवून खाली करून तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. तळमजल्यावरील दुकाने मात्र हलविण्यात आली नाहीत. याच रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेशेजारील इमारतीचा भाग कोसळून एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर ती इमारतही धोकादायक ठरविण्यात आली. मात्र तळमजल्यावरील वडापाव आणि गादी बनवणारी दुकाने मात्र निर्धोकपणे सुरू आहेत. विष्णूनगरमधील कामथे बिल्डिंगचीही सध्या अशीच अवस्था आहे. काही महिन्यांपूर्वी ही इमारत पाडून जागा रिकामी करण्यात आली. इमारतीच्या मोकळ्या जागेवरही सध्या एका कुंडी विक्रेत्याने दुकाने थाटले आहे.

भाडेकरू बाहेर गेल्याने मालकांच्या लेखी सुंठीवाचून खोकला गेला आहे. अतिधोकादायक म्हणून तातडीने रिकाम्या केलेल्या हरिनिवास सर्कल येथील यशवंत कुंज आणि आजीकृपा या इमारतींच्या विटेलाही दोन वर्षांत धक्का लागलेला नाही.

 तीन महिन्यांपूर्वी मी पत्राद्वारे ठाण्यातील भाडेकरूंची समस्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडली होती.  ठाण्यातही घरदुरुस्ती मंडळाची स्थापना करण्यात यावी. धोकादायक इमारतींना दुरुस्तीची संधी द्यावी. इमारतीसमोरील ९ मीटरच्या रस्त्याची अट शिथिल करावी. धोकादायक इमारतीतल रहिवाशांना हमीपत्र देण्यात यावे, अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करावे, अशी मागण्या केल्या होत्या, मात्र उत्तरही मिळाले नाही.

– महेंद्र मोने, नागरिक

भाडेकरूंचे पुनर्वसन केल्याशिवाय धोकादायक इमारतींच्या नव्या आराखडय़ांना मंजुरी न देण्याचे महापालिकेचे धोरण आहे. त्यामुळे त्यांचे हक्क अबाधित राहणार आहेत. रेंटल हाऊसिंगमध्ये काही समस्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या जातील.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

इमारत अतिधोकादायक ठरल्याने १५ महिन्यांपूर्वी आम्हाला विष्णूनगरमधील रेंटल हाऊसिंगमध्ये हलविण्यात आले आहे. दोन हजार रुपये भाडे भरूनही येथे लिफ्टमन, सुरक्षारक्षक, साफसफाईसाठी कर्मचारी नाहीत. वारंवार याबाबतीत पत्र व्यवहार करूनही उपयोग झालेला नाही. सध्या आम्हीच साफसफाईसाठी स्वच्छतासेवक नेमला आहे. त्याचे साडेपाच हजार रुपये वेतन आम्ही वर्गणी काढून भरतो.

ज्ञानेश्वर कदम, विस्थापित अजिकृपा बिल्डिंग, हरिनिवास सर्कल, ठाणे

इमारत धोकादायक ठरल्याने तीन-चार वर्षांपूर्वी आम्हाला घर खाली करण्यास भाग पाडले. तळमजल्यावरील दुकानदार मात्र तिथेच आहेत. इमारतीच्या पुनर्विकासाबाबत वारंवार विचारणा करूनही कोणतेही उत्तर मिळत नाही. महापालिका प्रशासनाने आम्हाला हमीपत्रही दिलेले नाही.

– विकास चितळे, कृष्णनिवास, गोखले रोड, ठाणे