टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतरही घरकामास मज्जाव
वसई : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जारी केल्यापासून घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झालेली आर्थिक कोंडी टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतरही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी मोलकरणी कामावर येण्यास इच्छुक आहेत, पण करोनाच्या भीतीने त्यांना कामावर येण्यास मज्जाव केला जात असल्यामुळे तसेच ‘काम नाही तर पगारही नाही’, अशी पद्धत असल्यामुळे घरोघरी जाऊन धुणीभांडी करणाऱ्या महिलांपुढे निर्माण झालेला कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे.
वसई-विरार शहरात करोनाच्या संकटाने आता उग्र रूप घेतले आहे. टाळेबंदीत काहीशी शिथिलता देण्यात आली असल्याने अनेक ठिकाणी मोलकरणी पुन्हा घरोघरी कामावर जाण्यास तयार आहेत. मात्र करोनाच्या भीतीमुळे अनेकांनी त्यांचे काम थांबवले आहे. करोनाच्या संकटामुळे सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना बसला आहे. कामावर गेले तरच पैसे मिळतात. त्यावरच घर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना कामाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. सध्या अनेक लोक पुढे येऊन या वर्गासाठी मदत करीत आहे. मात्र घरकाम करणाऱ्या मोलकरणी त्या काम करत असलेल्या ठिकाणांकडूनच उपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. ‘काम नाही, तर पगारही नाही’, अशी पद्धत मोलकरणींच्या बाबतीत अवलंबिण्यात येत असल्यामुळे या महिलांचे अक्षरश: हाल होत आहेत.
वसई-विरार शहरात हजारोंच्या संख्येने घरकाम करणाऱ्या महिला आहेत. सध्याच्या परिस्थितीत अशा महिलांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. अनेकांकडून वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. करोनामुळे त्या काम करत असलेल्या घरांमध्येही प्रवेश नाकारला जात आहे. टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली असली तरी त्यांना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे. करोनाचे संकट पूर्णत: संपल्यावरच कामावर येण्यास सांगितले जात आहे. घरकाम सुटले तर अन्य ठिकाणी काम करण्याचीही सध्या सोय नाही. त्यामुळे बँकांच्या कर्जाचे हप्ते, खाद्यसामग्री, जीवनावश्यक वस्तू, मुलांचे शैक्षणिक शुल्क याची चिंता असल्याने या महिला मोठय़ा तणावाखाली दिसून येत आहेत. घरकामगार महिला बहुसंख्य विधवा, आर्थिक दुर्बल असल्याने मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १४ ते १६ तास काम करतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशा घरकामगार महिलांवर संकट आले आहे. या महिलांना शासनाकडून दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण यासाठी दिवसातील १४ ते १६ तास घरोघरी धुणीभांडी करते. पण टाळेबंदी लागू झाल्यापासून आम्हाला कामावर बोलवत नाहीत. अडीच महिने बेकारीत काढले आहेत. हीच स्थिती पुढेही सुरू राहिल्यास करोनाऐवजी उपासमारीने आमचा शेवट होईल.
– पूनम पाटील, घरकामगार
ज्या महिलांनी आतापर्यंत आपल्या कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घेतली, त्यांना आर्थिक संकटात टाकणे अयोग्य आहे. नियम, हजेरी बाजूला ठेवून माणुसकीच्या दृष्टीने घरकामगार महिलांना त्यांच्या मालकांनी मदत करायला हवी.
– किरण चेंदवणकर, नगरसेविका