ठाण्यातील गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप मार्ग एकदिशा

ठाणे : शहरातील तीन पेट्रोल पंप भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. वर्तुळाकार पद्धतीने केलेल्या बदलांमुळे येथे एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू होताच हे बदल गुंडाळून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. असे असतानाच या रस्त्यांची कामे पूर्ण होताच वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी आता पुन्हा वर्तुळाकार पद्धतीने एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची एक महिन्याच्या प्रयोगिक त्त्त्वावर अंमलबजावणी सुरू केली आहे. या बदलास हरकत किंवा आक्षेप आले नाहीत तर हा बदल कायमस्वरूपी लागू केला जाणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलिसांनी शहरातील मार्गावर मोठे बदल करण्यास सुरुवात केली होती. त्याअंतर्गत राम मारुती रोड, गजानन महाराज चौक आणि तीन पेट्रोल पंप येथील वाहतूक वर्तुळाकार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. हे मार्ग एकदिशा मार्ग करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू होताच हे बदल गुंडाळून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. आता या रस्त्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी पूर्वीसारखेच वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वीर सावरकर पथ, तीन पेट्रोल पंप आणि गजानन चौक या भागांतील रस्ता अरुंद आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचेही काम सुरू होते. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच या मार्गाच्या कडेला वाहनेही उभी केली जात असल्याने कोंडीत भर पडते. ही कोंडी टाळण्यासाठी वीर सावरकर पथ या मार्गावरून एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

बदल असे

* तीन पेट्रोल पंप येथून गजानन चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे. येथील वाहने तीन पेट्रोलपंप येथून वंदना सिनेमामार्गे सोडण्यात येणार आहेत.

* त्यामुळे गजानन चौकातून तीन पेट्रोल पंपच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग एकदिशा सुरू राहणार आहे.

* एका महिन्याच्या प्रयोगिक तत्त्वावर हे बदल लागू राहणार आहेत.

* या बदलासंदर्भात कोणाच्या हरकती किंवा सूचना असतील तर त्यांनी तीन हात नाका येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

* या बदलास आक्षेप न आल्यास हे बदल कायम स्वरूपात लागू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.