ठाणे : घोडबंदरला पर्यायी रस्ता म्हणून खारेगाव ते गायमुख या खाडीकिनारी मार्गात बाधित होणाऱ्या कांदळवनच्या बदल्यात सातारा जिल्ह्यातील पर्यायी जमीन देण्याच्या हालचाली ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरु केल्या असल्या तरी या प्रकल्पात नेमकी किती खारफुटी बाधित होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच या प्रकल्पात खारफुटी नष्ट होणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींकडून याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

घोडबंदर येथील मुंबई- अहमदाबाद महामार्गावर अवजड तसेच इतर वाहनांची वाहतूक सुरु असते. त्यात मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने कोंडीत भर पडत आहे. या कोंडीतून घोडबंदरवासियांची सुटका करण्यासाठी ठाणे महापालिकेने खारेगाव ते गायमुख या खाडीकिनारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा मार्ग तयार करण्यात येणार असून या मार्गाचा पालिकेने आराखडा तयार करून एमएमआरडीएला दिला आहे. तसेच या प्रकल्पात बाधित होणारी जमिन संपादीत करण्याची प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मार्गात बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या बदल्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील वळवण गावात पर्यायी जमीन देण्याच्या हालचाली ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरु आहेत. १५ हेक्टर इतकी जमीन सातारा जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितील असून त्यासाठी ठाणे महापालिकेने सातारा जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली आहे. या जमिनीचे पैसे ठाणे महापालिका सातारा जिल्हा प्रशासनाला देणार असून याशिवाय. त्याठिकाणी जंगल तयार करण्यासाठी येणारा खर्चही पालिका करणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. असे असले तरी या प्रकल्पात नेमकी किती खारफुटी बाधित होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नसून याबाबत पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक मिलींद पाटणकर यांनी पालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांना पत्र पाठविले आहे. या रस्त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक समस्या कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. परंतु ठाणे परिसरावर पर्यावरण व जैवविविधतेवर काय आणि किती परिणाम होईल याचे विश्लेषण केले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  कांदळवन हे कार्बन शोषून घेणारे मोठे क्षेत्र म्हणून काम करते. विज्ञानाच्या दृष्टीने एक हेक्टर कांदळवन ३७५४ टन कार्बन शोषण करते.  रस्त्यावरील वाहनांचा केवळ मार्ग बदल होणार आहे. त्यातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड कमी होणार नाही. याचा घोडबंदर विभाग व ठाण्याच्या हवेवर काय परिणाम होईल याचा विचार तरी झाला आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या ताब्यात असलेली खूप जमीन आहे, ज्यावर जंगल विकसित करता येईल, ज्यामुळे कमीतकमी नुकसान होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. आजारापेक्षा औषधाचेच दुष्परिणाम जास्त असे होता काम नये. खाडी किनारी सुशोभिकरण यासारखे प्रकल्प राबवून आपण आधीच खाडी किनारा आणि पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. आगीतून फुफाट्यात अशी ठाण्याची अवस्था होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.