सुरूच्या बागेतील पाणथळ जागेवर मातीभराव; तिवरांची कत्तल केली नसल्याचा प्रांतअधिकाऱ्यांचा दावा
वसईच्या सुरूची बाग येथील संरक्षित पाणथळ जागेवर केलेला मातीभराव आणि तिवरांच्या झाडांच्या बेसुमार कतली प्रकरणात वसई प्रांतअधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सादर केला; परंतु या अहवालात पाणथळ जागेत मातीभराव करून रस्ता तयार करण्यात आल्याचे नमूद केले असून तिवरांच्या झाडांची कत्तल झालीच नसल्याचा अजब दावा करण्यात आला आहे. जर मातीभराव करताना कत्तल केली नाही, तर तिवरांची झाडे गेली कुठे, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
वसईच्या सौंदर्यात महत्त्वाचा मानला जाणार सुरूची बाग समुद्रकिनारा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या समुद्रकिनाऱ्यावरील जागा पाणथळ जागा म्हणून संरक्षित करण्यात आली आहे; परंतु या जागेवरील हिरवाई नष्ट करून तिचा व्यावसायिक दृष्टीने वापर करण्याचा डाव आखण्यात आला आहे. मौजे धवली सव्‍‌र्हे क्रमांक १०९, ११०, ११२, ११३, ११४ आणि ११५ या जागांवर बेकायदा मातीभराव टाकून रस्ता बनविण्यात आला आहे. त्याच्या अनेक तक्रारी तहसीलदारांपासून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. तिवरांची झाडे कापून नष्ट करून त्यावर भराव घालण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर वसई प्रांताधिकारी कार्यालयाने या जागेवर सर्वेक्षण केले. प्रदूषण नियामक मंडळाचे अधिकारी, वनखाते आणि तलाठी या वेळी उपस्थित होते. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी आणि तहासीलदारांना सादर करण्यात आला आहे. त्यात बेकायदा माती भराव झाल्याचे नमूद करण्यात आले असले तरी तिवरांची झाडे कापल्याचे कुठलेच पुरावे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आजही त्या ठिकाणी कापलेल्या तिवरांच्या झाडांचे अवशेष दिसून येतात, मग अधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. ज्यांच्या नावाने सात-बारा उतारा आहे, त्यांना भरावाबाबत नोटिसा पाठविल्या जाणार आहेत.