चटपटीत आणि चटकदार पदार्थ खाणे ही जणू भारतीयांची परंपरा आहे. त्या परंपरेतही कमालीचे वैविध्य आहे. प्रत्येक राज्यात आपापले वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ आहेत. ती प्रादेशिक वैशिष्टय़ांची परंपरा विशेषत्वाने जपली जाते. मध्य प्रदेशमधील नमकीन, गुजरातमधील जिलेबी- फाफडा प्रसिद्ध आहेत. आता महानगरी संस्कृतीत ठिकठिकाणी हे पदार्थ मिळतात. डोंबिवलीतील ‘मनपसंद’ या कॉर्नरवर गुजरातचे हे वैशिष्टय़पूर्ण पदार्थ मिळतात.
श्रावण महिन्यात अनेक कुटुंबे संपूर्णपणे मांसाहार व्यज्र्य करीत असतात. मात्र एरवीही आठवडय़ातले तीन वार सोडले तर उर्वरित चार दिवस ‘शाकाहार’ पाळला जातो. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी अनेकांचे उपवासही असतात. हल्ली उपवास म्हणजे उपाशी राहणे नसते. धावपळीच्या युगात ते शक्यही नसते. त्यामुळे उपवासाचे म्हणून खास पदार्थ खाऊन तो दिवस साजरा केला जातो. ‘मनपसंद’मध्ये उपवासाचेही असे खास पदार्थही मिळतात. विशेषत: येथील साबुदाणा खिचडी मस्तच.
इथे मिळणारी कडक भेळ अतिशय चविष्ट आणि रुचकर असते. ‘जिरा बटर’मध्ये दाबेलीची चटणी टाकून त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असे हा भेळीचा थाटमाट असतो. साधारणपणे दिवसाला सरासरी ४० प्लेट कडक भेळ सहज संपते. स्वस्त आणि मस्त असणारी ही भेळ पोट भरण्याचा उत्तम उपाय आहे. शिवाय त्यामुळे जिव्हाही तृप्त होते. नाश्त्यासाठी इथे मिळणाऱ्या पदार्थापैकी आणखी एक खास म्हणजे उपमा. किमान चार किलो गरमागरम उपमा सहज संपतो. उपम्याच्या जोडीला इथे पोहेसुद्धा मिळतात. दोन-चार जण एकत्र खायला आले तर उपमा आणि पोहे दोन्ही घेऊन वाटून घेतात. इथे मिळणारा पंजाबी समोसा वैशिष्टय़पूर्ण आहे. सारणातील भाजीत बटाटय़ाबरोबरच मटारचाही सढळ हस्ते वापर केलेला असतो. शिवाय त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा वापर केला जातो. त्यामुळे चवीला तो इतर समोशांपेक्षा उजवा ठरतो. संकष्टी चतुर्थी अथवा असाच एखादा उपवासाचा दिवस असेल तर साबुदाणा खिचडी, वडे, उपवासाची कचोरी, पॅटिस असे पदार्थ इथे मिळतात. उपवासाच्या पॅटिसमध्ये बटाटा, आरारोट, मिरची आदी जिन्नस एकत्र केले जातात. उपवासाची कचोरी चवीला गोड, तर पॅटिस थोडे तिखट असल्याचे दुकानाचे मालक प्रतीक गाला यांनी सांगितले. याशिवाय इथे उपवासाची मिसळही मिळते. उपनगरी प्रवासी अनेकदा सकाळी नाश्ता करून जातात तसेच गाडीतील मित्रांनाही पार्सल घेऊन जातात. येथील दाबेलीही प्रसिद्ध आहे. गरम आणि लुसलुसीत पावात टाकलेल्या दाबेलीच्या मसाल्याचा सुगंध परिसरात दरवळत असतो. त्यामुळे कधी एकदा येथील दाबेली खातोय असे इथे आलेल्या खवय्यांना होते. एक दाबेली खाऊन भूक भागत नाही. शिवाय मनही तृप्त होत नाही. त्यामुळे वनमोअरची दाद दिली जाते. या सर्वाव्यतिरिक्त महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचे खास वैशिष्टय़ मानले जाणारा वडापावही इथे मिळतो. कोकम सरबत, ताक आदी खास देशी थंड पेयसुद्धा इथे मिळतात. उन्हाळ्यात थंडगार कैरीचे पन्हे मिळते. १९८६ मध्ये हे दुकान सुरू झाले. सुरुवातीला थोडी हातगाडी होती. त्यानंतर मोठय़ा जागेत स्थलांतरित झाले. सकाळ-संध्याकाळ इथे खवय्यांची गर्दी पाहायला मिळते.
मनपसंद
- कुठे ? शॉप क्रमांक ७, सहारा को-ऑप. सोसायटी, एव्हरेस्ट सभागृह गल्ली, महात्मा गांधी क्रॉस रोड, रेल्वे स्थानकजवळ, डोंबिवली (प.)