शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

नवी मुंबईचा अपवाद वगळता ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागातील बहुतेक सर्वच स्थानिक प्राधिकरणांमध्ये गेल्या तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही विकास प्रकल्पांच्या आघाडीवर फारसे काही ठळक करून दाखविता न आल्यामुळे सुशिक्षित मराठी मतदार आता काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेलाही कंटाळला असल्याचे गेल्या तीन-चार वर्षांतील निवडणूक निकालांवरून दिसून आले आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळविता आले नव्हते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मराठी मनाचा कैवार घेणाऱ्या या पक्षाचे पितळ उघडे पडले. दस्तूरखुद्द ठाणे शहर मतदार संघात शिवसेनेला भाजपकडून पराभव पत्करावा लागला होता. अंबरनाथमध्येही भाजपच्या आव्हानापुढे शिवसेनेला कशीबशी आपली जागा राखता आली होती. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या जागा कैकपटीने वाढल्या आहेत. अंबरनाथमध्ये पूर्वी भाजपचा केवळ एक नगरसेवक होता. आता त्यांची संख्या दहा झाली आहे. बदलापूरमध्ये भाजपचे सात नगरसेवक होते. आता ते संख्याबळ  २० झाले आहे. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये डोंबिवली शहरात शिवसेनेला बसलेला फटका हे सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या नाराजीचेच द्योतक आहे.

अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, फसलेले कचरा व्यवस्थापन, पाणी टंचाई आदी समस्यांनी ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना ग्रासले आहे. मात्र येथील स्थानिक प्राधिकरणांमध्ये सातत्याने सत्ता उपभोगूनही शिवसेनेला या प्रश्नी फारसे काही करून दाखविता आलेले नाही. त्यामुळे मराठी मध्यमवर्गीय गेली काही वर्षे अन्य पर्यायांच्या शोधात होता. पाच वर्षांपूर्वी त्यातूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून यश मिळाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या शहरी भागात त्यावेळी मनसेचे लोकप्रतिनिधी मोठय़ा प्रमाणात निवडून आले होते. मात्र लोकसभा निवडणुकांपासून मनसेऐवजी भाजपच्या पर्यायाला मतदारांकडून पसंती मिळू लागल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे.