कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागातील डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयात सोमवारी संध्याकाळी एका मराठी भाषिक स्वागतिकेला गोकुळ झा या परप्रांतीय तरूणाने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणात मानपाडा पोलिसांनी गोकुळ झासह त्याच्या भावाला अटक केली आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मराठी तरूणीने पहिले गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात मारली. त्यानंतर पुढचा प्रकार घडल्याचे रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणातून स्पष्ट झाले आहे.
सोमवारी संध्याकाळी अनन्या झा तिचे लहान बाळ घेऊन डाॅ. पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयात आल्या होत्या. त्यांच्या सोबत तिचा पती, वहिनी, गोकुळ झा होते. डाॅक्टर रुग्णालयात आल्यानंतर पहिले औषध विक्रेता प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. त्यांची डाॅक्टर दालनात चर्चा सुरू असताना. झा कुटुंबीय आपणास लवकर प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. यावेळी मराठी स्वागतिकेने झा कुटुंबीयांना औषध विक्रेते प्रतिनिधी दालनातून बाहेर आले की मी तुम्हाला सोडते, असे बोलून तिने झा कुटुंबीयाला दालना बाहेर रोखले. यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये गोकुळने स्वागतिकेला शिवागाळ करत तो बाहेर गेला. दरम्यान संतप्त झालेल्या मराठी स्वागतिकेने आरोपी गोकुळ झाची वहिनी हिच्या कानशिलात मारली. याचा राग बाहेर उभ्या असलेल्या गोकुळ झाला आला.
आपल्या वहिनीला रुग्णालयातील तरुणीकडून मारहाण झाली असल्याचा राग अनावर झाल्याने त्याने रागाने येऊन स्वागत कक्षात उभ्या असलेल्या मराठी तरूणीच्या छातीवर पायाने लाथ मारली. ती खाली पडताच गोकुळने तिच्या केसाला पकडून तिला दोन ते तीन वेळा उचल आपट केली. यावेळी झालेल्या झटापटीत काही रुग्ण नातेवाईक मध्ये पडले आणि त्यांनी गोकुळच्या तावडीतून मराठी तरूणीची सुटका केली.
या घडल्या प्रकारानंतर डाॅक्टर दालनातून बाहेर आले. तरूणीने घडल्या प्रकरणाची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. गोकुळवर विनयभंग, मारहाणीचा गुन्हा तरूणीने दाखल केला आहे. याप्रकरणाला मराठी विरुध्द परप्रांतीय असा रंग आल्याने आणि मनसे, ठाकरे गट, भाजप नेते याप्रकरणात उतरल्याने पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून मंगळवारी रात्री फरार असलेल्या गोकुळ झाला अटक केली. न्यायालयाने गोकुळला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणाचा तपास करताना रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणात मराठी तरूणी पहिले झा कुटुंबायांमधील एक महिलेच्या कानशिलात मारत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रांतीय वादाच्या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. आता मराठी तरूणीवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.