सेलिब्रिटींची उपस्थिती, सामाजिक संदेशांद्वारे जनजागृती, नागरिकांचे स्पर्धकांना प्रोत्साहन
वसई-विरार महापालिकेने आयोजित केलेल्या ६व्या महापौर स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत १५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉनमध्ये स्पर्धक शहिदांना श्रद्धांजली देत आणि स्त्री-भ्रूण हत्या टाळा हा जनजागृती संदेश देत धावले. महापौर मॅरेथॉन स्पर्धेला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती व त्यांनी स्पर्धकांना दिलेले प्रोत्साहन यामुळे वसईकरांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
पहाटेच्या थंड वातावरणात सकाळी ठीक सहाच्या ठोक्याला वसई-विरार शहर महानगरपालिका आयोजित महापौर मॅरेथॉनला सुरुवात झाली. स्पर्धा मार्गावर दुतर्फा शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्पर्धकांसह, पाठिराख्यांचा, बघ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याने एकूणच वातावरणात स्फूर्ती संचारली होती. या ४२ किलोमीटरच्या स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉनबरोबरच ‘फन रन’ मध्येही मोठय़ा प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राचे विशेष सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांची उपस्थिती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, विजय पाटकर, विजय कदम, पंढरीनाथ कांबळी, शशांक केतकर, संदीप बोडसे, समीर कारंडे, अभिजित चव्हाण, अतुल तोडणकर, पंकज विष्णू, प्रसाद खांडेकर, विश्वनाथ चॅटर्जी आणि निर्माता प्रेम जिंजानी हे सिनेकलाकार मॅरेथॉनला उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धकांनी ‘फन रन’मध्ये मोठय़ा प्रमाणावर आपला सहभाग नोंदविला होता. वसई सनसिटी रोड येथे दररोज सकाळी वॉक करण्यास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या फ्रेंड्स मॉर्निग ग्रुप मार्फत ‘आई बाबांचा आदर करा’ हा संदेश देण्यात आला. तर शालेय मुलांकडून स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात आले. ‘अन्न वाया घालवू नका’ हा शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा संदेश वसईतील तरुणांकडून देण्यात आला.
खेळासाठीचे वातावरण बदलले
मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत सहभागी झालेली ललिता बाबर यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की, ऑलिम्पिक स्पर्धेनंतर देशातील खेळाच्या पोषक वातावरण तयार झाले आहे. आता अशा स्पर्धामध्ये ज्येष्ठांबरोबर तरुणही आपला फिटनेस वाढविण्यासाठी सहभागी होत आहेत. या स्पर्धेला मिळणारा मोठा प्रतिसाद २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चांगले धावपटू देऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्य़ातील विशेषत: ग्रामीण भागातील धावपटूंसाठी घेतलेली वेगळी स्पर्धा पुढील काळात अनेक धावपटू देणारी ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
झेंडा घेऊन उलटय़ा दिशेने धावण्याचे कसब
वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत भारताचा झेंडा हातात घेऊन एक ३३ वर्षीय तरुण २१ किमी उलटय़ा दिशेने धावत असल्याचे पाहावयास मिळाले. त्याने ३ तास २१ मिनिटे ४ सेकंदात हे अंतर पार केले. या तरुणाचे दीपक कनल असे नाव असून तो मीरा रोड परिसरात राहतो. सीमेवर देशासाठी लढत असताना प्राण गमावलेल्या शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी त्याने उलटय़ा दिशेने मॅरेथॉनमध्ये २१ किमी अंतर पार केले.
वयस्कर महिलेचे विजेतपद :
मॅरेथॉनमध्ये डोंगरपाडा येथे राहणाऱ्या रमीबाई पांडुरंग पाटील या ७५ वर्षीय महिला नऊवारी साडी परिधान करीत मॅरेथॉनमध्ये धावल्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून ३ किमीचे अंतर पार करत विजेतेपद मिळवले. रमीबाई पाटील या गेल्यावर्षीदेखील मॅरेथॉनमध्ये धावल्या असून त्यांचा हा उत्साह हा तरुणांना देखील लाजवेल असा होता.
महिला आणि पुरूषांतील दरी नष्ट
या स्पर्धेसाठी उपस्थिती लावलेल्या अभिनेते मनोज जोशी यांनी सांगितले की, पालघर जिल्हा हा नव्याने निर्माण झालेल्या आदिवासी जिल्ह्य़ामध्ये असलेल्या वसई-विरार महानगरपालिकेने गेल्या ६ वर्षांपासून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून एक चांगला आदर्श घालून दिला आहे. स्त्री-भ्रूण हत्या टाळण्यासाठी हा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचा केलेला उपयोग खरोखरच स्तुत्य आहे. महिला आणि पुरुषांना समान बक्षीस देऊन त्यातील दरी नष्ट करण्याचा प्रयत्न या पालिकेने केला आहे.