आपल्या जोडीदाराविषयी मनात भावना कितीही असल्या तरी प्रेमाचा तो एक दिवस काहीतरी खास असतो. व्हॅलेंटाइन दिवसाचे निमित्त असल्यावर जोडीदाराला प्रेमाचे प्रतीक असलेली काही भेटवस्तू देण्यासाठी तरुणांसह ज्येष्ठ लोकसुद्धा व्हॅलेंटाइन दिवस जवळ येऊ लागला की बाजारात गर्दी करतात. सुरुवातीला केवळ भावना शब्दात व्यक्त करण्याइतपत प्रेम सीमित होते. काळ बदलला तशी आधुनिक जीवनशैली आत्मसात करणाऱ्या पिढीची जगण्याची परिभाषा बदलली. प्रेमासारख्या नाजूक भावनेलासुद्धा या आधुनिक जीवनशैलीने स्पर्श केला आणि प्रेम व्यक्त करण्याचे वेगळे प्रवाह दिसू लागले. पत्र लिहिण्याचा काळ मागे पडत पत्रांची जागा रंगीबेरंगी भेटकार्डानी घेतली. प्रेमाचा संदेश देणारे हे भेटकार्ड आजही तरुणांच्या पसंतीस उतरतात. आकर्षक भेटवस्तू देऊन आपल्या जोडीदाराला खूश करण्याची पद्धत रूढ झाल्यावर बाजारात वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करणाऱ्या भेटवस्तू दिसू लागल्या. व्हॅलेंटाइन डे जवळ येऊ लागताच ठाण्याच्या बाजारातील विविध दुकाने प्रेमाचा संदेश देणाऱ्या लाल, गुलाबी रंगाच्या भेटवस्तूंनी सजली आहेत. या दिवसाच्या निमित्ताने बाजारातील प्रेमवस्तूंचा घेतलेला आढावा..
स्वित्र्झलडमधील सोरोस्की क्रिस्टल
व्हेलेंटाइन डे म्हटला की प्रेमाच्या प्रतीक असलेल्या ताजमहलची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या प्रेयसीला ताजमहलची भेट देऊन तिला आपल्या प्रेमाची आठवण करून देण्याचा हा जुना फंडा आजही तितकाच तरुणाईच्या पसंतीला उतरत आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काही तरी वेगळी, आकर्षक भेटवस्तू आपल्या जोडीदाराला द्यायची असल्यास बाजारात उपलब्ध असलेला सोरोस्की क्रिस्टल या काचेच्या प्रकारातील ताजमहाल उत्तम पर्याय आहे. शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाची प्रतिकृती म्हणून बाजारात हा सोरोस्की ब्रँडचा असलेला काचेचा ताजमहाल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे हा ताजमहाल स्वित्र्झलड येथे बनवण्यात आला असून व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ठाण्याच्या बाजारात दिसत आहे.
टेडी बुके
भेटवस्तू देण्यासाठी यंदा टेडी बुके बाजारातील भेटवस्तूंमध्ये आकर्षण ठरत आहे. साधारणत: वेगवेगळ्या रंगांचे पुष्पगुच्छ पाहायला मिळतात. मात्र खास व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने यामध्ये वेगळेपण आले असून पुष्पगुच्छांची जागा आता टेडी बेअरने घेतली आहे. फुलांच्या जागी लहान आकाराचे टेडी बेअर एकत्रित करून पुष्पगुच्छासारखे स्वरूप त्याला देण्यात आले आहे. नेहमीच पुष्पगुच्छ देण्यापेक्षा असंख्य टेडी बेअरचा एकत्रित संच बुकेच्या माध्यमातून देण्यास बाजारात उपलब्ध देत आहे. या टेडी बुकेमध्ये विविध रंगांचा समावेश असून एका खोक्यात हा टेडी बुके ठेवण्यात आला आहे. खोक्याच्या रंगाचे टेडी त्यात असून खोका उघडल्यावर अतिशय आकर्षक वाटतात.
परफ्यूम विथ की-चेन
सुगंधी परफ्युम ही प्रिय व्यक्तीला देण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट ओळखली जाते. मात्र हा परफ्युम पारंपरिक कुपीमध्ये देण्याऐवजी तो जर चावीसाठी वापरल्या जाणाऱ्या की-चेनसारख्या कुपीतून दिल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते. ही भेटवस्तू सुरुवातीला दिसायला अगदी लहान आणि नाजूक असलेले की-चेनप्रमाणेच असल्याचा भास होते. मात्र विशिष्ट प्रकारे या की-चेनवर असलेली चावी फिरवल्यावर त्यात अत्तर असल्याचे लक्षात येते. नाजूक पण पाहताच क्षणी कुणाही व्यक्तीला भावेल असे हे की-चेन लहान भेटवस्तू म्हणून देण्यास उत्तम पर्याय आहे.
प्लास्टिकमुक्त प्रेमाची भेटवस्तू
यंदा बाजारात प्लॉस्टिकमुक्त प्रेमाची भेटवस्तू देण्यासाठी पेपर बॅग्स (कागदी पिशव्या) उपलब्ध आहेत. संपूर्णपणे कागदाच्या बनवलेल्या या पिशव्या विविध रंगांत आहेत. पिशव्यांवर प्रेमाचे संदेश, दोन टेडी बेअरची चित्रे, प्रेमभावना दर्शवणाऱ्या हृदयाचे आकार दिसत आहेत. प्लास्टिक वज्र्य असल्याने या कागदी पिशव्यांकडे ग्राहक गर्दी करीत आहेत. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीला प्रदूषणमुक्त अशा भेटवस्तू देण्याकडे तरुणाईचा कल यंदा मोठा दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market decoreted with attractive gifts of love
First published on: 13-02-2016 at 03:55 IST