कुख्यात मटकाकिंग बाबू नाडर याच्या ठाणे पूर्व भागातील अड्डय़ावर हाणामारी करून तेथील रोकड लुटल्याप्रकरणी पाच पोलीस हवालदारांविरोधात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झालेला असतानाच नाडर याने पोलीस ठाण्यात घुसून मटक्याचे पैसे चोरणाऱ्या पोलिसांनाच बेदम मारहाण केल्याने ठाणे पोलिसांच्या अब्रूचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. नाडर व त्याच्या साथीदारांनी घातलेल्या या धुडगुसामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे पूर्वेकडील नाडरच्या जुगाराच्या अड्डय़ावर स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेने अनेकदा धाडी टाकून त्यावर कारवाई केली आहे. मात्र, या तोंडदेखल्या कारवाईनंतरही हा जुगाराचा अड्डा बंद झालेला नाही. मंगळवारी रात्री याच अड्डयावर निकालावरून वाद निर्माण झाला. वादाचे पयर्वसन बघता-बघता हाणामारीत झाले. यामध्ये एका राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता सनी उर्फ करण खरे याला जबर मारहाण झाली.
सनीला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी चक्क ठाणे पोलीस दलातील काही कर्मचारी नाडरच्या अड्डयावर काही मिनिटांतच अवतरले. पोलीस हवालदार विजेंद्र कदम, विनोद नेमाने, संदीप देसाई, स्वप्नील ताजणे, मयुर ढोंगे आणि अन्य एक व्यक्ती अशा सहा जणांनी जुगार अड्डयावर धडक देत तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि जुगाराचे पैसेही लुटून नेले, असा त्यांच्यावर आरोप आहे. हे पाचही पोलीस हवालदार ठाणे शहर तसेच ग्रामीण दलातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या घटनेप्रकरणी कोपरी पोलिसांनी सात जणांविरोधात अटकेची कारवाई करून त्यांना पोलीस ठाण्यात ठेवले होते. अड्डय़ावर झालेल्या प्रकाराची खबर मिळताच संतप्त झालेल्या नाडर याने त्याच्या साथीदारांसह थेट पोलीस ठाण्यावरच हल्लाबोल केला. पोलीस ठाण्यात शिरून त्याने अटकेत असलेल्या पाचही हवालदार व अन्य दोघांना प्रचंड शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
विशेष म्हणजे पोलिसांसमक्षच हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी बाबू नाडरला अटक केली. परंतु झालेल्या प्रकारामुळे ठाणे पोलिसांची पुरती नाचक्की झाली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कोपरी पोलीस ठाण्यात दिवसभर ठाण मांडून बसले होते.