कल्याण येथील वाडेघर येथील महापालिकेच्या आरक्षित जमिनीचा नियमबाह्य़ टीडीआर दिल्या प्रकरणाची शासनाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला असून चर्चा करण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पालिका आयुक्त मधुकर अर्दड, पुणे येथील नगररचना संचालकांना ६ मे रोजी मंत्रालयात बोलावले आहे. शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत वाडेघर येथील टीडीआर घोटाळा उघड केला होता. यात पालिकेचे दोन माजी आयुक्त, नगररचना विभागातील अधिकारी यांचा सहभाग असल्याची तक्रार शासनाकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. हा घोटाळा करताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. नगरविकास विभागाने वाडेघर येथील जमिनीत टीडीआर घोटाळा झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश विधान परिषद सभापतींनी दिले होते. ठाण्याच्या साहाय्यक संचालक नगररचनाकारांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या आरक्षित जमिनीवरील तीन ते चार वेळा पालिका अधिकाऱ्यांकडून टीडीआर देण्यात आला आहे. या जागेवर अतिक्रमणे आहेत. तरीही टीडीआर दिल्याने याप्रकरणी गौडबंगाल उघड झाले आहे.