रूळ ओलांडू नका..रूळांवरून चालणे गुन्हा आहे..हा प्रवास प्राणघातक ठरू शकतो..अशी घोषणाबाजी करत प्रवाशांना रूळ ओलांडण्यास मध्य रेल्वेकडून मनाई करण्यात येते. मात्र रविवारी रेल्वे प्रशासनाच्याच अक्षम्य चुकीमुळे शेकडो प्रवाशांना नाइलाजास्तव रूळांवरून प्रवास करावा लागला.
रविवारी मेगाब्लॉकदरम्यान प्रवाशांना स्थानकाबाहेरच रेल्वे रूळांवर उतरवले. कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांना प्लॅटफॉर्म येण्यापूर्वीच गाडी थांबविली. त्यामुळे प्रवाशांना रूळांवरून चालत प्लॅटाफॉर्म गाठावा लागला. मेगाब्लॉकमुळे रखडलेल्या गाडय़ांमध्ये वैतागलेल्या प्रवाशांना ही अडथळ्यांची शर्यत पार करताना मोठा त्रास सहन करावा लागला.
कल्याणकडून धीम्या मार्गावरून ठाण्याकडे येणाऱ्या सगळ्या गाडय़ांची वाहतूक रविवारी मेगाब्लॉकच्या दरम्यान जलद मार्गावरून होत होती. या गाडय़ा जलद मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असताना तेथील खाडीपुलाजवळ थांबवण्यात येत होती. त्याच वेळी पुढील स्टेशन मुंब्रा अशी उद्घोषणाही होत होती. या गोंधळामुळे गोंधळलेल्या प्रवाशांनी थांबलेल्या गाडीतून उतरून मुंब्रा स्थानकाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. रेल्वे रूळांवरून प्रवासी चालत जात असल्याने त्यांचा जिवाधोका निर्माण झाला होता. शिवाय गाडी थांबलेल्या भागाच्या बाजूला गटार असल्याने गाडीतून उतरणारे अनेक प्रवासी थेट गटारामध्येच पडण्याचे प्रकार घडत होते. मेगाब्लॉकच्या काळात ही समस्या कायम होती.
 
गैरसोय कायम
धिम्या मार्गावर असलेल्या मुंब्रा आणि कळवावासीयांना मेगाब्लॉकच्या दरम्यान मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागते. जलद रूळांवरून जाणाऱ्या गाडय़ासुद्धा मोठय़ा प्रमाणात खोळंबत असल्याने प्रवाशांना रूळांवर उतरून चालत लवकर पोहचू असे वाटते. त्यामुळे थांबलेल्या गाडीतून प्रवासी उतरण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे या प्रवाशांना रेल्वे रूळावर उतरू नका, अशा सुचना देण्याबरोबरच गाडी रेल्वे फलाटावर जलद गतीने पोहचवण्याची गरज आहे, असे मत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे आदेश भगत यांनी व्यक्त केले.