थकबाकीदार दुकानांना टाळे ठोकणे, व्यापाऱ्यांना नोटीसा पाठवणे, रिलायन्सला दंड ठोठावणे आदी पावले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उचलल्यामुळे व्यापारी लॉबी दुखावली होती तसेच शिवसेना-भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता होती. शहर विकास विभागातला एकही प्रस्ताव मंजूर न झाल्याने बिल्डर लॉबी आणि त्यांच्याशी संबंधित नेतेही अस्वस्थ होते. या पाश्र्वभूमीवर जयस्वाल तडकाफडकी दीर्घ रजेवर गेल्याने ठाण्यात उलटसुलट चर्चेला उत आला आहे.
ठाणे महापालिकेत राजकीय आणि प्रशासकीय अनागोंदीने अक्षरश: टोक गाठले असून महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना कोटय़वधी रुपयांच्या ठेक्यांना मंजुरी देण्यात आल्याचे प्रकार गेल्या वर्षभरात घडले आहेत. व्यापारी तसेच मोठय़ा उद्योजकांकडून कोटय़वधी रुपयांचा मालमत्ता तसेच स्थानिक संस्था कर थकविला जात असताना असीम गुप्ता यांच्या काळात उत्पन्न वाढीसाठी ठोस प्रयत्न होत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत गुप्ता यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणारे जयस्वाल यांनी कर वसुली आणि उत्पन्न वाढीसाठी काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती.
त्यांच्या धडक कारवाईत शहरातील काही बडय़ा मॉलमधील दुकानांना टाळे ठोकण्यात आले तर व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. गुप्ता यांच्या काळात रिलायन्स उद्योग समूहाला फोर-जी तंत्रज्ञानासाठी वाहिन्या टाकण्याकरिता सवलतीच्या दरात परवानगी देण्यात आल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. जयस्वाल यांनी रिलायन्सला तब्बल २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठाविल्याने सत्ताधारी शिवसेनेसह भाजपच्या वर्तुळातही काहीसा नाराजीचा सूर उमटू लागला होता. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत शहर विकास विभागातील एकही प्रस्ताव जयस्वाल यांनी मंजूर केला नव्हता. त्यामुळे बिल्डर आणि त्यांच्याशी संबंधित काही राजकीय नेते कमालीचे अस्वस्थ होते.
करवाढ कारणीभूत?
दरम्यान, महापालिकेची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जयस्वाल यांनी पाणी, मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, विकास शुल्कात वाढ करण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडले होते. मात्र, एकमेकांची राजकीय उणीदुणी काढण्यात मग्न असलेल्या येथील सर्वच राजकीय पक्षांनी हे विषय तहकूब कसे राहतील, यासाठी प्रयत्न चालविले होते. करवाढीशिवाय पर्याय नाही असे जयस्वाल यांचे स्पष्ट मत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यास उघड विरोध केला तर सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनीही हे प्रस्ताव गुंडाळून ठेवल्याने जयस्वाल नाराज होते, अशी चर्चा होती.
या प्रकरणी जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यांचे महापालिकेतील स्वीय साहाय्यक महेश राजदेरकर यांनी ते रजेवर गेल्याचे स्पष्ट केले. ही रजा वैयक्तिक स्वरूपाची असून इतर कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, असेही राजदेरकर यांनी स्पष्ट केले.
ठाणे क्लबची अस्वस्थता
महापालिकेच्या मालकीची वास्तू असलेल्या ठाणे क्लबमधील ठेकेदार सर्वसाधारण सभेच्या परवानगीशिवाय सदस्यांकडून मनमानी शुल्काची मागणी करत असल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उघड केल्यामुळे जयस्वाल यांच्यावर राजकीय दबाव वाढला होता. या ठेकेदारास स्थानिक राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा असल्याने एकीकडे राजकीय दबाव तर दुसरीकडे जनभावनेची नाराजी अशा दुहेरी कात्रीत जयस्वाल सापडले होते. या पाश्र्वभूमीवर २० एप्रिलपासून त्यांनी वैयक्तिक कारणास्तव ४२ दिवसांची रजा टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2015 रोजी प्रकाशित
व्यापारी लॉबीची ‘असीम’ मनमानी रोखल्याचा फटका?
थकबाकीदार दुकानांना टाळे ठोकणे, व्यापाऱ्यांना नोटीसा पाठवणे, रिलायन्सला दंड ठोठावणे आदी पावले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उचलल्यामुळे व्यापारी लॉबी दुखावली होती तसेच शिवसेना-भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता होती.
First published on: 25-04-2015 at 01:54 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Merchent loby in thane