|| कल्पेश भोईर
महावितरणकडून लाखो रुपयांचा दंड वसूल
वसई : वाढत्या वीजचोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या कठोर उपाययोजनांमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. मागील नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये ७१७ वीजचोरांविरोधात महावितरणने कारवाई केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात वीजचोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. मीटरमध्ये फेरफार करणे, आकडे टाकून वीजचोरी करणे अशा विविध प्रकारच्या छुप्या मार्गाने वीजचोरी केली जात होती. महावितरणाने अनेक वेळा कारवाई करूनही वीजचोरी होण्याचे प्रकार सुरूच होते. वीजचोरांना लगाम घालण्यासाठी महावितरण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली. वीजचोरांवर लक्ष ठेवण्यासाठी संतोष भवन, वालीव, कोल्ही-चिंचोटी, जूचंद्र, बाजारवाडा, फुलपाडा, विरार पूर्व यासह इतर भागात विशेष पथकाची नेमणूक करून कारवाई करण्यास सुरुवात केली. गेल्या नऊ महिन्यांत महावितरणने ७१७ जणांवर कारवाई केली. या वीजचोरांनी महावितरणचे तब्बल ८ लाख ६१ हजार ५८९ युनिटची चोरी केली होती. म्हणजेच १ कोटी २७ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे.
सव्वा कोटीची वीजचोरी
- ७१७ जणांकडून महावितरणची साडेआठ लाखांहून अधिक युनिट म्हणजेच १ कोटी २७ लाखाची वीजचोरी.
- वीजचोरी झालेल्या रकमेपैकी ३२९ जणांकडून ६६ लाख ६३ हजार रक्कम वसूल करण्यात आली.
- ५० जणांवर महावितरण वीजचोरी कायद्यानुसार कारवाई करून १७ लाख ५७ हजार दंडाची वसुली
- २५७ प्रकरणांत परिमागणन करून ११ लाख ३४ हजार रक्कम वसूल
वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणची कारवाई सुरूच असते. वीजचोरी थांबली पाहिजे यासाठी महावितरणतर्फे विशेष मोहिमाही घेतल्या जात आहेत. ही कारवाई अधिक तीव्र करून ज्या ठिकाणी चोरी केली जात असेल, त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाईल. – मंदार अत्रे, अधीक्षक अभियंता महावितरण विभाग वसई