शहापूर : बिहारच्या धर्तीवर जातगणना करा अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी शहापुरात केली. कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत, ती तत्काळ थांबवून त्याची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नये, मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये तसेच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय ओबीसी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते यांनी त्यांच्या शहापूर तालुक्यातील वालशेत या गावात रविवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निचिते यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी सांगितल्यानंतर निचिते यांनी उपोषण मागे घेतले.
हेही वाचा >>>भाईंदर : मीरा रोडमध्ये परिवहन बस चालकाला मारहाण
बिहारच्या धर्तीवर राज्यात जातगणना करावी. मराठ्यांना आमचा विरोध नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्या. अशी ओबीसींची साधी मागणी आहे. ओबीसींमध्ये घुसखोरी करू नका असे भुजबळ यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत, ती तत्काळ थांबवून त्याची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. जातगणानेसाठी किती खर्च होतोय तो होऊ द्या, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार, राहुल गांधी, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जातगणना करून घ्या असे म्हटले आहे. मग, अडलय कुठे आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शहापूरमध्ये बंद
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नये, मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये तसेच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय ओबीसी महासभेचे गुरुवारी शहापूर बंदची हाक दिली होती. त्याला अनेक दुकानदारांनी प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली होती.