बदलापुराजवळ एरंजाड गावात किरकोळ वादातून गोळीबार
बंदी असूनही बदलापुरजवळ बैलगाडी शर्यती होत असल्याचे गोळीबाराच्या एका घटनेतून स्पष्ट झाले आहे. नगरपालिका हद्दीतील एरंजाड गावात शर्यतीदरम्यान गोळीबाराची घटना घडली. याविरोधात कारवाई करण्यात स्थानिक कुचकामी ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
बैलांवर मोठय़ा प्रमाणावर शारीरिक अत्याचार करून शर्यतीत पारितोषिके पटकावली जातात. प्राणी संरक्षण आणि हक्क संघटनांनी याविरोधात न्यायालयीन लढाई लढून बंदीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने बंदी घातली.
मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काही अटींच्या अधीन राहून अशा बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्याचा वादग्रस्त निर्णय दिला. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ही बंदी कायम ठेवण्यात आली. असे असले तरी ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात आजही छुप्या पद्धतीने मोठय़ा प्रमाणावर बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडत असून बदलापुरातील गोळीबार प्रकरणामुळे अशाच एका शर्यत महोत्सवाचे पितळ उघडे पडले. अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील काही गावांमध्ये शर्यतींचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी प्राणी प्रेमींमधून सातत्याने केल्या जात आहेत. तरीही जिल्हा प्रशासन तसेच पोलिसांकडून उचित कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी आहेत. रविवारी बदलापूर नगरपालिका हद्दीतील एरंजाड गावात अशाच प्रकारे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीदरम्यान बैलाने अचानकपणे उसळी घेतल्याने बैलगाडा मालकावर प्रतिस्पध्र्यानी शेरेबाजी केली. त्या शेरेबाजीचा राग मनात धरून दोन गटांत शाब्दिक चकमक झाली आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. यावेळी काहींनी हवेत गोळीबार केल्याची तक्रार पुढे आली आहे. याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली असून तुषार गायकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चिखलोली येथील अविनाश पवार आणि उमेश पवार यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर पोळेकर यांनी याबाबतही कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच गोळीबार बाबतही तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बदलापूरजवळील एरंजाड, ढोके दापिवली, आंबेशिव या आसपाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर बैलगाडा शर्यती होत असल्याचे याआधीही समोर आले होते. या भागात अनेक फार्महाऊ स असून तेथील मालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांच्या भीतीने कुणी
तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने याप्रकरणी कुणावर कारवाई होऊ शकत नव्हती. या शर्यतींना स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचेही बोलले जाते.



