Mira Road Murder: मीरा रोड हत्याकांडामुळे सगळा देश हादरला. मनोज सानेने सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शेजाऱ्यांना वास येऊ लागल्याने हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर मनोज सानेला अटकही करण्यात आली. मात्र मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या आणल्या होत्या अशी माहिती आता समोर येते आहे. एवढंच नाही तर त्याने मृतदेहाचे फोटोही काढले होते. ते फोटो पाहून सरस्वतीच्या बहिणीला रडू कोसळलं. त्या फोटोंमध्ये एक फोटो तिच्या लांबसडक केसांचा आहे.

मनोजने सरस्वतीची हत्या केल्यावर नेमकं काय केलं?

मनोजने सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर तिच्या डोक्यावरचे केसही कापले. मनोजला सरस्वतीचे केस आवडत असतं त्यामुळे तिने लांब केस वाढवले होते. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने तिचे केस कापून ओट्यावर लटकवले होते. तसंच मृतदेहाचे फोटो काढले. हे फोटो मनोजच्या मोबाईलमध्ये होते. ते पाहिल्यानंतर सरस्वतीच्या बहिणी खूपच भावूक झाल्या आणि त्यांना रडू कोसळलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच सरस्वतीच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून मनोज सानेने पाच बाटल्या निलगिरी तेल आणलं होतं असंही पोलिसांनी सांगितलं.

सरस्वती वैद्य अनाथ होती असं मनोजने सुरुवातीला सांगितलं होतं. तसंच मी हत्या केली नाही असंही तो म्हणाला होता. मात्र ही बातमी पाहून सरस्वतीच्या तीन बहिणींनी पोलीस ठाणं गाठलं. सरस्वतीला तीन बहिणी आहेत हे पोलिसांना अनाथ आश्रमातून समजलं होतं. ते त्यांना शोधणार होते मात्र त्याच पोलीस ठाण्यात आल्या. त्यांचे डीएनए नमुने आता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसंच या तिघींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. ANI च्या वृत्तानुसार सरस्वतीच्या बहिणींनी मनोज सानेला कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी म्हणून अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची ते गुगलवर शोधलं

मनोज सानेने सरस्वतीची हत्या केली. तसंच तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह नष्ट कसा करायचा हे मनोजने गुगवर शोधलं होतं आणि त्याने निलगिरी तेलाच्या पाच बाटल्याही आणल्या होत्या. मृतदेहाची दुर्गंधी पसरु नये म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी केल्या. तसंच त्याने एक इलेक्ट्रीकल कटर विकत घेतलं होतं. मृतदेहाचे तुकडे करताना या कटरची चेन बंद पडली होती ती त्याने ज्या दुकानातून ते वुड कटर विकत घेतलं तिथूनच दुरुस्त करुन घेतली होती. घराजवळच्या एका दुकानातून मनोज सानेने निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या विकत आणल्या होत्या अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज साने आणि सरस्वती वैद्य या दोघांनी बोरीवलीतल्या एका मंदिरात लग्न केलं होतं. या लग्नाची कल्पना सरस्वतीच्या बहिणींना होती. मात्र या दोघांनी आपण लग्न केलं आहे हे कुणालाही सांगितलं नव्हतं. या दोघांमध्ये वयाचं अंतर बरंच असल्याने त्यांनी ही बाब समाजापासून लपवून ठेवली होती असंही पोलिसांनी सांगितलं.