सकवार येथील आदिवासी तरुणाने सांभाळ केला; विरार पोलिसांचा तपास यशस्वी

गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या करणच्या वाटेवर त्याचे आई-वडील डोळे लावून बसले होते. १२ वर्षांच्या करणच्या परतण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. पण चमत्कार घडावा तशा नाटय़मय घडामोडी घडल्या आणि करण घरी परतला. विरार पोलिसांनी केलेल्या तपासामुळे करण दोन वर्षांनी त्याच्या कुटुंबीयांकडे परत जाऊ  शकला.

करण राजभर (१२) हा मूळचा उत्तर प्रदेशचा. २०१४ मध्ये भाईंदरमधील उत्तन येथे राहणाऱ्या त्याच्या भावाने त्याला बोलावले होते. करण प्रथमच मुंबईत आला होता. त्यामुळे त्याला सगळा परिसर नवखा होता. एकदा उत्तनच्या किनाऱ्यावर तो फिरायला गेला होता. घरी परताना तो बस चुकला. पुन्हा घरी कसे जायचे त्याला माहीत नव्हते. संपर्काचे साधन नव्हते. रडकुंडीला आलेला करण घर शोधत असताना विरारच्या सकवार येथे पोहोचला. करण घरी न पोहोचल्याने त्याचा भाऊ  संजय याने पोलिसात तक्रार दिली होती. आपल्याकडे राहायला आलेला लहान भाऊ  बेपत्ता झाल्याने तो पुरता निराश झाला होता.

विरारच्या सकवार येथे नत्थू बतरा या एका आदिवासी तरुणाने करणला पाहिले. करणची विचारपूस केली; परंतु करणला आपल्या घरचा पत्ता सांगता आला नाही. त्यामुळे नत्थूने करणला आपल्या घरात ठेवून त्याचा सांभाळ सुरू केला. नत्थूची परिस्थिती बेताची असल्याने त्याने करणला कामाला लावायचे ठरवले. एका हॉटेलात त्याला काम मिळवून दिले. हॉटेलमध्ये करणचे मन रमले नाही. हॉटेलमधील कामाला कंटाळून करणने २०१५ मधून तेथून पळ काढला होता. नत्थूने करण बेपत्ता असल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

मांडवीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल रायपुरे यांना करण भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समजले. लगेच तेथून त्याला ताब्यात घेतले. कामाच्या शोधात करण आल्याने  हॉटेलचालकाने सांगितले. नत्थूला करण मिळाला, परंतु नत्थू त्याचा मूळ पालक नसल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे त्यांनी करणच्या मूळ पालकांना शोधण्याचे ठरवले. विरार पोलिसांनी करणला बोलते करून जसे त्याला आठवेल तसे त्याच्या गावच्या खाणाखुणा विचारून अंदाज लावला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. करणचा भाऊ  भाईंदरच्या उत्तन गावात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच उत्तनला जाऊ न चौकशी केली असता करणचा भाऊ  सापडला. हरवलेला भाऊ  तब्बल दोन वर्षांनी परतल्याने संजय राजभरच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. उत्तर प्रदेशातील करणच्या पालकांना हा एक चमत्कारच वाटत आहे. नत्थूने दोन वर्षे करणचा सांभाळ केला होता. करण दूर जात असल्याची खंत नत्थूला आहे, पण त्याच वेळी त्याच्या मूळ गावी आई-वडिलांकडे तो परत जाणार असल्याच्या आनंदाने त्याचे डोळे भरून आले.