भाईंदरमध्ये कारशेड बांधण्यास ‘एमएमआरडीए’कडून नकार; महापालिका दुसऱ्या जागेच्या शोधात
दहिसपर्यंत आलेली मेट्रो रेल्वे भाईंदपर्यंत वाढवण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याने या मार्गाची नुकतीच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. या वेळी मेट्रोसाठी आवश्यक असलेली कारशेड बांधण्याची महापालिकेने सुचवलेली जागा सीआरझेडने बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने या ठिकाणी कारशेड बांधण्यास एमएमआरडीएकडून नकार देण्यात आला. मीरा भाईंदर महानगरपालिकेला आता कारशेड बांधण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
मुंबईत असलेली मेट्रो आता मीरा-भाईंदरच्या प्रवेशद्वारापर्यंत म्हणजेच दहिसपर्यंत येत असल्याने ती पुढे मीरा-भाईंदपर्यंत वाढवण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली. मीरा-भाईंदर महापालिकेने तसा प्रस्तावही संमत करून एमएमआरडीएला पाठवला आहे. या पाश्र्वभूमीवर एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी नुकतीच मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्गाची पाहणी केली. दहिसरनंतर काशिमीरा नाका आणि थेट गोल्डन नेस्ट सर्कल अशी ही मेट्रो येणार आहे. गोल्डन नेस्ट सर्कलवरून ती डावीकडे भाईंदर पश्चिम आणि उजवीकडे इंद्रलोकपर्यंत जाणार आहे. यासाठी एक कारशेडदेखील उभारायची आहे. कारशेडसाठी सुमारे साडेबारा एकर जागा आवश्यक आहे. महापालिकेने कारशेडसाठी इंद्रलोक तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ अशा दोन जागा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दाखवल्या. परंतु दोन्ही जागा सीआरझेडमध्ये येत असल्याने अधिकाऱ्यांनी या जागांच्या प्रस्तावाला नकार दिला. कारशेड उभारणीसाठी आता महापालिकेला नवीन जागा शोधून द्यावी लागणार आहे. महापालिकेने जागा अंतिम केल्यानंतर एमएमआरडीएकडून त्याला मान्यता देण्यात येणार आहे. सुमारे महिन्याभरात मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार होणार असून त्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून या वेळी देण्यात आली.
भाईंदर-काशिमीरा रस्त्यावरील सिल्वर पार्क, गोल्डन नेस्ट येथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या मेट्रोच्या मार्गात येणार आहेत. त्यावरही एमएमआरडीएला तोडगा काढावा लागणार आहे.
उड्डाणपुलांचे काम सुरू होणार?
मेट्रो भाईंदपर्यंत आणण्याआधी भाईंदर ते काशिमीरा या रस्त्यावर तीन उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हे उड्डाणपूल एमएमआरडीएच बांधणार होती. परंतु दरम्यानच्या काळात आधी केवळ दहिसपर्यंत येणारी मेट्रो मीरा-भाईंदपर्यंत आणावी यासाठी जनमताचा रेटा वाढू लागला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचा विस्तार मीरा-भाईंदपर्यंत करण्यास मान्यता दिली. मेट्रोचा मार्गही भाईंदर काशिमीरा रस्त्यावरूनच जात असल्याने एमएमआरडीएने उड्डाणपुलांच्या कामाला स्थगिती दिली होती. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या मेट्रो मार्गाच्या पाहणीत मेट्रोचा मार्ग आणि उड्डाणपूल यांचा मेळ कसा घालता येईल याचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मेट्रोसह उड्डाणपुलांचे कामही सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कारशेडसाठी सुचविण्यात आलेल्या जागा सीआरझेडमध्ये असल्याने एमएमआरडीए अधिकाऱ्यांना आणखी चार ते पाच जागा दाखविण्यात आल्या आहेत. यापैकी योग्य वाटणारी एक जागा एमएमआरडीए नक्की करेल.
– आमदार नरेंद्र मेहता.