अनेक ठिकाणी पाणी साचले; नालेसफाईचा दावा फोल; आपत्कालीन यंत्रणा कोलमडली
वसई-विरार शहरात पावसाने हाहाकार उडवला असून शहराच्या विविध भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ज्या ठिकाणी आधी कधी पाणी भरत नव्हते, तो भागही जलमय झाला होता. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा बोऱ्या उडाला. नालेसफाई केल्याचा दावा पालिकेने केला असला तरी पावसामुळे हा दावा फोल ठरला.
रविवार रात्रीपासून वसई-विरार शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवार दुपापर्यंत वसईत १८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे, गालानगर, सेंट्रल पार्क येथे पाणी साचले होते. विरार पश्चिम येथील मुख्य रस्ता, एसटी रोड, विवा एविराटनगर, विवा महाविद्यालय परिसर जलमय झाला होता. वसई पश्चिमेच्या सनसिटी आणि पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी, वसंतनगरी आदी भागात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या मात्र कुठेही जीवितहानी झाली नाही. पालिकेने शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करून यंदा पाणी तुंबणार नसल्याचा दावा केला होता. मात्र पहिल्याच मोठय़ा पावसाने हा दावा खोटा ठरवला होता. ज्या ठिकाणी एरवी पाणी साचत नाही, त्या ठिकाणी पाणी साचले होते. वसईच्या तुंगारेश्वर परिसरात भिंत आणि विजेचे खांब कोसळून तीन घरांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत कुणी जखमी झाले नाही. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात वाहने बंद पडत होती.
पालिकेने आपत्कालीन कक्ष उभारला आहे. आम्ही सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे पालिका अधिकारी सांगत होते. मात्र या पहिल्याच मोठय़ा पावसात सारी यंत्रणा कोलमडून पडली होती. नालासोपारा येथील अनेक घरात पावसाचे पाणी साचले होते. वसई पूर्वेला भोयदापाडा, गोखिवरा या परिसरात औद्योगिक कंपन्यांचे दूषित पाणी रस्त्यावर आले होते. पावसामुळे अनेक भागातील रिक्षा वाहतूक बंद झाल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली. रात्रभर शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
नालासोपाऱ्यात पूरसदृश परिस्थिती
नालासोपारा पूर्वेचा संतोष भुवन, बिलाल पाडा, धानीव, नवजीवन हा भाग डोंगरालगत आहे. त्यामुळे डोंगरावरील पाणी आणि शहरात साचलेले पाणी यामुळे या भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. धानीव बाग, नवजीवन, वालई पाडा या भागातील घरांतही पाणी शिरले होते. तुळिंज, मोरेगाव, आचोळे रोड तसेच सेंट्रल पार्क, प्रगतीनगर, विजयनगर ९० फुटी रस्ता, उड्डाण पूल परिसर जलमय झाला होता.
औद्योगिक कंपन्यांचे दूषित पाणी रस्त्यावर
वसई पूर्वेला औद्योगिक कंपन्या आणि कारखाने आहेत. पावसामुळे या कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर आले होते. गोखिवरे, भोयदापाडा येथील घरात हे पाणी शिरले. या पाण्याला भयानक दरुगधी येत होती. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका रहिवाशांनी व्यक्त केला. सातिवली, वालीव, गावराई पाडा येथील भागही जलमय झाला होता.
मनवेल पाडय़ात घरांमध्ये पाणी
विरार पूर्वेच्या मनवेल पाडा, कारगिलनगर येथील संपूर्ण भाग जलमय झाला होता. त्यामुळे चाळी आणि इमारतींच्या तळमजल्यावरील घरात पाणी शिरले होते. दिवसभर घरातील लोक पाणी उपसत होते. पाण्यामुळे घरातील सामान खराब होऊ नये म्हणून पलंगावर काढून ठेवले होते.