अंबरनाथ शहराच्या पश्चिम विभागात आयुध निर्माणी कारखान्यालगतचे जावसई ते बदलापूर हद्दीलगतच्या चिखलोलीपर्यंत पालिकेचे १ ते १५ प्रभाग आहेत. बहुसंख्येने कष्टकरी, कामगार वर्गाच्या वस्त्या असणारा हा परिसर शहराचा बहुभाषिक (कॉस्मोपॉलिटिन) चेहरा आहे. त्यामुळे सहाजिकच निवडणुकीत या विभागातून संमिश्र प्रतिसाद मिळत असतो.
ठाणे जिल्ह्य़ातील रिपाइंचे प्रभुत्त्व असलेले जे काही मोजके पॉकेटस् आहेत, त्यात हा विभाग गणला जातो. यंदा रिपाइं पक्ष अधिकृतपणे भाजपसोबत असला तरी स्थानिक नेते श्याम गायकवाड यांना मानणाऱ्या रिपाइं (सेक्युलर) ने यंदा राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. गेल्या दोन पालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपाइंच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या हात या निशाणीवर निवडणूक लढवली होती. यंदा त्यांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ हाती बांधले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत फितुरी करणाऱ्या रिपाइंसोबत आघाडी करू नये, अशी काँग्रेसची भूमिका होती. मात्र राष्ट्रवादीने ती मानली नाही. त्यामुळे अर्थातच काँग्रस यंदा स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे.
जात प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावरून काही प्रभागातील निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अंबरनाथमधील नऊ प्रभागांमध्ये त्यामुळे मंगळवापर्यंत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली नव्हती. त्यामुळे या विभागातील प्रभाग क्र. २, (फुलेनगर), प्रभाग क्र. ६ (खामकर वाडी) आणि प्रभाग क्र. ९ (बुवापाडा) या प्रभागातील उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैध की अवैधच्या कात्रीत येथील उमेदवारांचा प्रचाराचा अख्खा आठवडा वाया गेला आहे. खुंटवली गावठाण-मेटलनगर (प्रभाग क्र. १३) मधून उत्तम आयवळे तर बालाजीनगरमधून (प्रभाग क्र. १४) मनीषा वाळेकर यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. खामकरवाडी (प्रभाग क्र. ६) प्रभागातूनही शिवसेना पुरस्कृत निखिल वाळेकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले होते. मात्र जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती वैध ठरली तर या प्रभागात निवडणूक होऊ शकते. भास्करनगर परिसरातून ( प्रभाग क्र. १०) शिवसेनेचे राजेंद्र वाळेकर आणि राष्ट्रवादीच्या चिन्ह्य़ावर निवडणूक लढवीत असलेले रिपाइंचे शहराध्यक्ष धनंजय सुर्वे उभे असून शहरातील प्रमुख लक्षवेधी लढतींपैकी ती एक मानली जाते.
दोघेही विद्यमान नगरसेवक आहेत. नवरेनगर विभागात (प्रभाग क्र. ४) सेना-भाजपचे उमेदवार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थेट दुरंगी लढत आहे. काँग्रेसच्या हात चिन्ह्य़ावर गेली निवडणूक लढविणाऱ्या रिपाइंच्या सुधा गायकवाड यंदा राष्ट्रवादीच्या उमेदवार असून त्यांचा थेट सामना काँग्रेसच्या अर्चना रसाळ यांच्याशी होत आहे. गणेश टेकडी विभागातून (प्रभाग क्र. ११) राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिपाइंचे कबीर गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. मात्र पात्र-अपात्र उमेदवारांच्या घोळामुळे अद्याप येथील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊ शकलेली नाही.
प्रभागनिहाय प्रमुख लढती
* प्रभाग क्र. १ जावसई (सर्वसाधारण खुला) येथून सर्वाधिक १२ जण निवडणूक रिंगणात आहेत. दिनेश गायकवाड (काँग्रेस), आत्माराम तांबे (शिवसेना), वसंत पाटील (भाजप), शोभा मोरे (राष्ट्रवादी), गजेंद्रनाथ सरकार (अपक्ष- भाजप बंडखोर) आणि अन्य सात.
* प्रभाग क्र. ३. काथोडपाडा-कमलाकरनगर (महिला राखीव) सुप्रिया रसाळ (शिवसेना), करुणा रसाळ पाटील (भाजप) कमल भोईर (अपक्ष).
* प्रभाग क्र. ४ नवरेपार्क-नारायणनगर (सर्वसाधारण महिला) सुधा गायकवाड (राष्ट्रवादी) अर्चना रसाळ (काँग्रेस)
* प्रभाग क्र. ५ शिवलिंग नगर (अनुसुचित जाती) अनंत कांबळे (शिवसेना), वसंत जाधव (राष्ट्रवादी).
* प्रभाग क्र. ७ बुवापाडा पूर्व क्षेत्र-चिखलोली सवरेदयनगर (सर्वसाधारण महिला) या प्रभागातूनही एकूण १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उषा भालेकर (भाजप), रेखा यादव (राष्ट्रवादी), ऋती सिंह (काँग्रेस), साधना सिंह (शिवसेना), वंदना सोनकांबळे (भारिप बहुजन महासंघ) अन्य पाच अपक्ष.
* प्रभाग क्र. ८ बुवापाडा वीटभट्टी विभाग (सर्वसाधारण) हिरालाल गुप्ता (भाजप), प्रमोदकुमार चौबे (शिवसेना), लालमन यादव (राष्ट्रवादी), सुरेंद्र यादव (काँग्रेस).
* प्रभाग क्र. १०. भास्करनगर परिसर (सर्वसाधारण) राजेंद्र वाळेकर (शिवसेना), धनंजय सुर्वे (राष्ट्रवादी), रणविजय यादव (भाजप), विजय मौर्य (काँग्रेस). अरुणा भरसाळे (मनसे).
* प्रभाग क्र. १२. खुंटवली वरचा पाडा (अनुसुचित जाती) वंदना लोटे (अपक्ष) संदिप लोटे (शिवसेना).
* प्रभाग क्र. १३ खुंटवली गावठाण मेटलनगर (अनुसुचित जाती) उत्तम आयवळे (शिवसेना) बिनविरोध.
* प्रभाग क्र. १४. बालाजीनगर (सर्वसाधारण महिला) मनीषा वाळेकर (शिवसेना) बिनविरोध.
* प्रभाग क्र. १५ चिंचपाडा (इतर मागासवर्गीय-महिला) वंदना पगारे (भाजप), वृषाली पाटील (राष्ट्रवादी), लतिका ठाणगे (अपक्ष).