सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत असलेल्या ठाणे शहरात दर्दी खवैय्यांसाठीही अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. निरनिराळ्या प्रांतातील वैशिष्टय़पूर्ण पदार्थाची चव ठाण्यात चाखायला मिळते. किरकोळ पोटपूजेच्या चाटपासून ते थेट जेवणापर्यंत विविध पदार्थाची पंगत एकाच कॉर्नरमध्ये मिळण्याची एक नवीन पद्धत हल्ली लोकप्रिय होत चालली आहे. ठाण्यातही ‘मुंबई चस्का’ नामक कॉर्नरमध्ये खाण्याचे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. पारंपरिक भारतीय पदार्थाना नावीन्यपूर्ण रेसिपीज्ची फोडणी देऊन नव्या चवीच्या डिश खवैय्यांना देण्यासाठी सतींदर कौर यांनी दोन महिन्यांपूर्वी हे कॉर्नर सुरू केले. भारतीय खाद्यपदार्थाचे हे फ्यूझन झक्कास आहेच, पण त्याचबरोबर या कॉर्नरची अंतर्गत सजावटही नजरबंदी करणारी आहे. विविध प्रकारच्या भाज्या आणि खाद्य पदार्थाच्या डिशने कॉर्नरच्या भिंती सजविण्यात आल्या आहेत. ‘फूड इज फ्युएल नॉट थेरपी’, ‘हार्डवर्क शुड बी रिवार्ड बाय गुड अँड फूड’, अशी अनेक सुवचने येथे पाहायला मिळतात. त्यामुळे इथे आल्यावर आपण एका वेगळ्या विश्वात आल्याचा भास होतो.
‘मुंबई चस्का’मध्ये आपल्याला सामोसा छोले, संगम, दहीबटाटा वडा, डोसा, पावभाजी, राजमा चावल, पाणीपुरी, थिक शेक्स अशा ४५ निरनिराळ्या पदार्थाची चव चाखायला मिळते. चहा, खास बंगळुरहून मागविलेल्या कॉफीपासून तयार केलेली दाक्षिणात्य कॉफी, मसाला ताक, लिंबू आणि कोकम सरबत असे थंडपेय येथे उपलब्ध आहेत. उपमा, पोहे, बटाटा वडा, मिसळ पाव, शिरा, उपवासाचा साबुदाणा वडा आणि झणझणीत थालीपिठासारख्या पारंपरिक मराठमोळ्या खाद्य पदार्थाबरोबरच येथे आपल्याला इडली सांबर, मेदुवडा सांबर, फिंगर चिप्स असा दाक्षिणात्य आणि पाश्चिमात्य नाश्त्याही मिळतो.
या कॉर्नरचे वेगळेपण म्हणजे येथे मिळणारे डोसे आणि पंजाबी पदार्थ. सादा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर मसाला डोसा या आपल्या दररोजच्या माहिती असणाऱ्या डोशांबरोबरच बटाटय़ाच्या भाजीमध्ये आंबट तिखट चटणी टाकून तयार केलेला चटपटा डोसा, बटाटय़ाची भाजी आणि चिली टॉमेटो सॉस घालून केलेला चीज चिली डोसा असे काही फ्युजन डोसेसुद्धा येथे उपलब्ध आहेत. पंजाबी सामोसा, वैशिटय़पूर्ण असे सामोसा छोले, टिक्की छोले आणि आगळावेगळा असा छोले पाव असे हे चवदार पंजाबी पदार्थ म्हणजे खाद्य रसिकांसाठी एक मेजवानीच असते.
नाश्त्याबरोबरच येथे आपल्याला ऑल टाइम फेव्हरेट चाट आणि पावभाजीचीसुद्धा चव चाखायला मिळते. चाटमध्ये पाणीपुरी, शेवपुरी, मसाला पुरीबरोबरच पुरीमध्ये बटाटा, गोड- तिखट चटणी आणि दही घालून तयार केलेली दही बटाटा पुरी, शेवपुरीचे तुकडे करून तिखट-गोड चटणी आणि दही टाकून तयार केलेला पापडी चाटही येथे उपलब्ध आहे. येथील पाणीपुरीचे वैशिष्टय़ म्हणजे पुरीमध्ये रगडय़ाऐवजी पंजाबी किंवा दिल्ली स्टाइलप्रमाणे बटाटा, मूग आणि बुंदी टाकली जाते. पावभाजीमध्ये येथे आपल्याला फक्त रेग्युलर पावभाजी आणि चीज पावभाजीची चव चाखायला मिळते.
या सगळ्या नाश्ता आणि स्नॅक्सबरोबर येथे मिळणारे जेवण हेसुद्धा तितकेच लाजबाब आहे. छोले चावल, राजमा चावल अशा पारंपरिक पंजाबी खाद्य पदार्थाबरोबरच पोळीभाजी, भात आणि गोड पदार्थ असलेलं मिनी मिल, स्पेशल थाळी आणि त्याचबरोबर विकेन्ड स्पेशल बिर्याणी आणि रायता अशा पोटभरीचा जेवणाची चवही येथे आपण अनुभवू शकतो. सगळं जेवण आणि नाश्ता झाल्यावर आईस्क्रीम घुसळवून त्यात मँगो, चॉकलेट , ब्लॅक करंट किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर टाकून तयार केले जाणारे वैशिष्टय़पूर्ण असे थिक शेक्स आणि नवाबी पान, पेरू, मिल्क चॉकलेट विथ फ्रुट अँड नट, जिंजर कॅरेमल असे निरनिराळे आईस्क्रीम आणि शेक्स बघून जिभेला पाणी सुटते.
‘मुंबई चस्का’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारे संगम आणि दही बटाटा वडा. संगम हा पदार्थ मिसळ आणि इडली यांचं मिश्रण करून तयार केला जातो. इडली आणि मिसळ एकत्रित करून त्यात तिखट आणि गोड चटणी टाकून चस्का स्पेशल संगम तयार केला जातो. दही बटाटा वडा हा बटाटा वडय़ावर दही, तिखट गोड चटणी आणि शेव टाकून तयार केला जातो.
कुठे?
मुंबई चस्का, शॉप नंबर ९, राज आर्केड, राज रेसिडेन्सी, पीएमसी बँकेजवळ, ब्रह्मांड, ठाणे (प.).