scorecardresearch

Premium

खारफुटी रोपणासाठी मुंबई पालिकेला २४ हेक्टर जमीन

चार महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यत तीन लाख खारफुटींचे रोपण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

mangrove land
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे जिल्ह्यत तीन लाख खारफुटींचे रोपण करणार

ठाणे : मुंबई महापालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये कत्तल होणाऱ्या खारफुटींच्या पुनरेपणासाठी ठाणे जिल्ह्यात सुरू असलेली जागेची शोधमोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या पट्टय़ातील खाडीकिनारी असलेली तब्बल २४ हेक्टर जमीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या कांदळवन विभागाकडे सोपवली आहे. दरम्यान, राज्य सरकारने चालू वर्षांत ठाणे जिल्ह्यात तब्बल तीन लाख खारफुटींचे रोपण करण्याचे लक्ष्य आखले आहे.

मुंबईतील खारफुटी क्षेत्र कमी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर याची भरपाई म्हणून ठाणे जिल्ह्य़ातील जमिनीवर मुंबई महापालिकेने खारफुटींचे रोपण करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे जमिनीची मागणी केली होती. मुंबई महापालिकेच्या कांदळवन लागवड विभाग आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या तालुक्यांत कांदळवन लागवडीसाठी योग्य असलेल्या जमिनींची पाहणी करण्यात आली होती. अखेर जिल्ह्य़ातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या भागातील २४ हेक्टर जमीन मुंबई महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कांदळवन विभागाचे मुख्य संरक्षक एन. वासुदेवन यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मुंबई महापालिकेने एकूण ३५ हेक्टर जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार उर्वरित जागेचा शोध घेण्यात येत आहे. ही जागा निश्चित झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ताब्यात दिली जाणार आहे. या ३५ हेक्टर जमिनीचे हस्तांतर झाल्यानंतर खारफुटी लागवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही वासुदेवन यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील खारफुटी क्षेत्रात ३१ चौरस किमी एवढी वाढ झाल्याचे केंद्र सरकारच्या वन सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. मात्र, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, कळवा अशा पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर खारफुटीची कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. ठाणे महापालिकेच्या चौपाटी विकास कार्यक्रमासाठीही खारफुटींची कत्तल होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी पुढील चार महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यत तीन लाख खारफुटींचे रोपण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात खारफुटीच्या लागवडीसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे ३५ हेक्टर जमिनीची मागणी केली होती. यापैकी २४ हेक्टर जमीन कांदळवन कक्षाला उपलब्ध झाली आहे. या वर्षांत उर्वरित जमीन मिळाल्यावर या ठिकाणी खारफुटीची लागवड सुरू होईल. अन्यथा या ठिकाणी पुढच्या वर्षी लागवड होईल. ४० लाख खारफुटी लागवडीचे ध्येय असल्याने या लागवडीचा निश्चितच फायदा होणार आहे.

– एन. वासुदेवन, मुख्य वनसंरक्षक, कांदळवन विभाग

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai municipal corporation get 24 hectares land for mangrove plantation

First published on: 26-07-2018 at 01:25 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×