मुंबईतील रिक्षाचालकांची भाईंदरमध्ये घुसखोरी

२००८ पासून रिक्षा व्यावसायिकांना मुंबई महानगर क्षेत्रात कोठेही व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली.

परवानगी नसताना व्यवसाय; प्राधिकरणाचा नियम धाब्यावर
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार रिक्षा व्यावसायिक दुसऱ्या नोंदणी प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवासी घेऊन जाऊ शकतात. परंतु दुसऱ्या क्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी दैनंदिन व्यवसाय करण्यास त्यांना परवानगी नाही. परंतु प्राधिकरणाचा हा नियम धाब्यावर बसवून मुंबईतील अनेक रिक्षाचालक मीरा-भाईंदरमध्ये राजरोसपणे व्यवसाय करत आहे. मीरा-भाईंदरमधील रिक्षाचालकांच्या अधिकारावर यामुळे गदा येत असल्याने रिक्षा संघटनांनी याबाबत वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र घुसखोर रिक्षा व्यावसायिकांवर प्रतिबंध घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
२००८ पासून रिक्षा व्यावसायिकांना मुंबई महानगर क्षेत्रात कोठेही व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी देताना रिक्षा व्यावसायिकांना दुसऱ्या क्षेत्रात केवळ प्रवासी सोडण्याचे अथवा दुसऱ्या क्षेत्रातून आपल्या क्षेतातील प्रवासी परत आणण्याचे बंधन रिक्षा व्यावसायिकांवर घालण्यात आले आहे.
दुसऱ्या क्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी दैनंदिन व्यवसाय करण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही. परंतु एकमेकांच्या हद्दीत व्यवसाय करण्याची परवानगी मिळाल्याचा अनेक रिक्षाचालक गैरफायदा घेत आहेत.
विशेष करून मुंबईतील अनेक रिक्षाचालक हे प्रवासी घेऊन मीरा-भाईंदरमध्ये आल्यानंतर प्रवासी सोडून परत न जाता दिवसभर याच ठिकाणी व्यवसाय करतात. याचा मीरा-भाईंदरच्या स्थानिक रिक्षा व्यावसायिकांच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत असल्याचे तसेच रिक्षा व्यावसायिकांमध्ये वारंवार वादविवाद होत असल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.

उपोषणाचा इशारा
परवाना व बॅच नसतानाही सुरू असलेल्या रिक्षा, खासगी बसगाडय़ांकडून सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, सीएनजी पंपची कमी असलेली संख्या आदी रिक्षा व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी रिक्षा संघटनांनी १० फेब्रुवारीला काशीमीरा येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात मीरा-भाईंदर ऑटो-टॅक्सी ट्रेड युनियन, मीरा-भाईंदर रिपब्लिकन रिक्षा-चालक मालक युनियन, बहुजन विकास वाहतूक आघाडी, जय हिंद आदी संघटना सहभागी झाल्या आहेत.

पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मीरा-भाईंदरमध्ये व्यवसाय करणाऱ्या दुसऱ्या क्षेत्रातील रिक्षांवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. पंरतु आजपर्यंत ठोस कारवाई झाली नाही.
– प्रमोद म्हात्रे, बहुजन विकास वाहतूक आघाडी

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या वर्षी अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्या २००० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. रिक्षा संघटनांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.
– विलास चौगुले, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai rickshaw infiltration in bhayandar

ताज्या बातम्या