गणेशोत्सवाप्रमाणेच सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना मंडप उभारणीसाठी आकारण्यात येणारे भाडे माफ करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्षे करोनाच्या काळात निर्बंधांमुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला नव्हता. यंदा करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण व उत्सवांवरील निर्बंध हटविले. यामुळे दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला.

करोना काळात पुरेशी वर्गणी गोळा होत नव्हती. तसेच प्रायोजकांनीही हात आखडता घेतला होता. यामुळे बहुतांशी सार्वजनिक मंडळे आर्थिक विवंचनेत होती. सर्व सार्वजनिक मंडळे सामाजिक उपक्रम राबवित असतात. या मंडळांचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच असतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळे गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. या मंडळांना दिलासा मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे संपूर्ण भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : ५०० ते हजार रुपयांत चिमुकल्या मुलांची वेठबिगारीसाठी खरेदी; ठाणे, पालघर जिल्ह्यातील चिमुकल्यांची नगरमधील मेंढपालाकडे वेठबिगारी

त्याच धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना मंडप उभारणीसाठी आकारण्यात येणारे भाडे माफ करावे, अशी मागणी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली होती. ही मागणी आयुक्त डॉ. शर्मा यांनी मान्य केल्याने मंडळांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्व मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन माजी महापौर म्हस्के यांनी केले आहे.