विरार : बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून भावाने तिच्या पतीची सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच चाकूने वार करून हत्या केली. नालासोपारा पश्चिमेच्या धनंजय नाका येथील मातृछाया इमारतीत राहणारा आकाश कोल्हेकर (२५)याची पत्नी कोमल (२०) हिने  रविवारी सकाळी  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी  नातेवाईक साताऱ्याहून  आले होते. सोमवारी  नालासोपारा पोलिसांनी चारच्या सुमारास कोमलच्या पतीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते.  गुन्हे प्रकटीकरण कक्षात त्याची चौकशी सुरू होती. यावेळी कोमलचा भाऊ रवींद्र काळे हाही आला होता. पोलीस चौकशी करत असताना रवींद्रने आपल्या खिशातून चाकू काढून आकाशवर वार केले. पोलिसांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.  तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रवींद्र याला अटक केली आहे.