ठाणे : घोडबंदर येथे मित्राची सोनसाखळी मिळविण्यासाठी त्याचा खून केल्याची घटना ताजी असतानाच भिवंडी येथील पडघा भागात या प्रकाराची पुनरावृत्ती झालेली आहे. पडघा येथे मयूर जाधव (२०) याने मित्राची सोनसाखळी मिळविण्यासाठी त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मयूरला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

पडघा येथील वडवली भागात आकाश शेलार (२०)  राहतो. ११ सप्टेंबरला त्याचा मृतदेह या भागात आढळून आला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. दरम्यान यातील आरोपी हा आकाश शेलार याच्या शेजारी राहणारा त्याचा मित्र मयूर जाधव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मयूरला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने खून केल्याची कबुली दिली. आकाश याच्या गळ्यात एक सोनसाखळी होती. ही सोनसाखळी मयूरला हवी होती. ११ सप्टेंबरला मयूरने आकाशला भेटण्यासाठी एका निर्जनस्थळी बोलावले. आकाश त्या ठिकाणी आल्यानंतर मयूरने त्याच्याजवळील लाकडी फळीच्या मदतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आकाश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

मयूरला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पडघा पोलीस करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.