ठाण्यातील माजिवडा येथे मृत व्यक्तीचा खोटा अंगठा उमटवून सातबारावर स्वत:चे नाव लावून तीनशे कोटी रुपयांच्या इमारती बांधणाऱ्या बिल्डरचे नाव घेण्यास सरकार का तयार नाही, असा सवाल करत विरोधकांनी विधानसभेत भाजपची कोंडी केली. अखेर संबंधित विकासकाचे नाव पटलावर ठेवले जाईल तसेच याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
जन्ननाथ पाटील हे २००६ मध्ये मरण पावलेले असताना २००७ साली माजीवडा येथील जागेच्या फेरफारात त्यांच्या अंगठय़ाचा ठसा असल्याचे दाखवून एका बडय़ा विकासकाने सातबारावर आपले नाव नोंदवून घेतले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी विकासकावर गुन्हा दाखल न करता तलाठी, मंडल अधिकारी तसेच विकासकाकडे काम करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विधानसभेत लेखी उत्तरात याची माहिती देण्यात आली असतानाही प्रश्नोत्तराच्या वेळी अध्यक्षांनी सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत पुढचा प्रश्न पुकारला. यापुढे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारने लेखी उत्तर दिले असून कायदे करणाऱ्या सभागृहाला न्यायप्रविष्ट विषयावर न्यायालयाच्या अधिन राहून चर्चा करता येते असे सांगितले. सरकार बिल्डरला का पाठीशी घालते व हा बिल्डर कोण आहे असा सवाल करत बिल्डरचे नाव जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी  लावून धरली. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे याची माहिती आपण घेतलेली नसल्यामुळे नाव सांगता येणार नाही, असे उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले.
 हे ‘लोढणे’ सरकार का लपवत आहे असा सवाल करत लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.  अखेर आपण सर्व माहिती घेऊन पटलावर ठेवू असे महसूलमंत्र्यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Name of developer hidden in thane land scam
First published on: 28-03-2015 at 04:26 IST