दिघ्यातील बेकायदा इमारतप्रश्नी आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
नवी मुंबई येथील दिघा भागातील बेकायदा इमारतींवरील कारवाईच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह संतप्त झालेल्या रहिवाशांनी शनिवारी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी भागातील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जमल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावरच आंदोलन करण्यात आल्यामुळे परिसरातील संकुलामधील नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा मार्ग काही काळ बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण सरकार लवकरच आणणार आहे, या आशेवर कारवाई टाळण्यासाठी दिघा येथील कमलाकर आणि पांडुरंग इमारतीमधील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने या रहिवाशांना दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे एमआयडीसीने बांधकामांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. इमारतीतील रहिवाशांना नोटिसा पाठवून घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात येणार असून त्यामुळे इमारतीतील रहिवासी बेघर होणार आहेत. या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह संतप्त झालेल्या रहिवाशांनी शनिवारी सकाळी पालकमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिंदे हे कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले असल्याचे समजल्यानंतरही त्यांचे आंदोलन सुरूच होते. तसेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp agitation at eknath shinde house
First published on: 12-06-2016 at 02:11 IST