राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत हितगुज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावण्याची जोरदार स्पर्धा एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये रंगली असताना राष्ट्रवादीतील संभाव्य फूट रोखण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्याच्या राजकारणात उडी घेतल्याचे वृत्त आहे. विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड या दोघा नेत्यांच्या गटात विखुरल्या गेलेल्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत स्वत पवार हितगुज साधू लागले असून राज्यातील बदलत्या राजकारणाचा दाखला देत या मंडळींना सूचक इशारेही दिले जात असल्याची चर्चा आहे. थोरल्या पवारांकडून दिल्या जाणाऱ्या या कानमंत्रामुळे घोडबंदर परिसरातील राष्ट्रवादीच्या तिघा नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्याचा विचार तूर्तास सोडून दिल्याचे बोलले जाते.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपने कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील नगरसेवकांना एकामागोमाग एक गळाला लावत आघाडीच्या आव्हानातील हवाच काढून घेतली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचलेले नगरसेवक युतीच्या नेत्यांकडून देण्यात येणारे आवतण खुशीने स्वीकारताना दिसले. निवडणुकीपूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गळती लागल्याने या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला एकत्रितपणे दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. ठाण्याच्या निवडणुकीतही शिवसेना-भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा धडाका सुरू केला आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीतील गळती थांबवण्यासाठी आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच आता लक्ष घातले आहे. पक्षातील नाराज नगरसेवकांसोबत पवारांनी संवाद सुरू केला असून मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर ढवळून निघालेल्या राजकारणाचे दाखलेही काठावर असलेल्या या मंडळींना दिले जात आहेत.

शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या घोडबंदर परिसरातील पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याची पवार यांनी चांगलीच शाळा घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर हा पदाधिकारी आपण पक्ष सोडणार नाही. उलट दोन पॅनल (आठ नगरसेवक) निवडून आणतो असा विडा उचलतच पवारांच्या दरबारातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. ठाण्यात येताच या पदाधिकाऱ्याने वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड अशा दोन्ही नेत्यांची भेट घेऊन ‘मी पक्षातच राहाणार’ असा शब्द दिल्याची चर्चा आहे.

फोडाफोडीचे राजकारण

  • कॉँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्यापाठोपाठ बसपच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करताच शिवसेनेनेही फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे.
  • दिवा आणि ठाण्यातील मनसेचे तीन तर कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील प्रत्येकी एक नगरसेवक शिवसेनेने आतापर्यंत गळाला लावले आहेत.
  • वागळे इस्टेट तसेच घोडबंदर पट्टय़ातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आणखी दोघे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp issue in thane
First published on: 29-09-2016 at 04:30 IST