राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय सोशल मीडियावरुन जाहीर केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली असून अटकपूर्व जामिनासाठी र्ज केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांनी गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? अशी विचारणा केली आहे. २ वाजता कोर्ट याप्रकरणी निकाल देणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. घटनास्थळी प्रचंड गर्दी होती असं सांगताना आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते अशी माहिती त्यांना कोर्टात दिली. तसंच महिलेने याआधी दोन पुरुषांना धक्काबुक्की केली होती असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा; नेत्यांकडून मनधरणी

आव्हाड यांनी त्या महिलेला बहीण मानलं आहे. त्या आव्हाडांपेक्षा खूप लहान आहेत. ते उच्च शिक्षित आहेत, आमदार आहेत. प्रचंड मताने मुंब्रा- कळवा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याकडून हे कृत्य कसं होईल असा युक्तिवाद वकिलांनी केला.

फिर्यादी आणि साक्षीदारला प्रभावीत केलं जाऊ शकतं असा युक्तिवाद करत पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली. यावर आव्हाड यांच्या वकिलांनी हा गुन्हा ३५४ कलमांतर्गत दाखल होऊ शकत नाही असं सांगतिलं. तसंच तक्रारदार महिलेला फक्त गर्दीतून बाजूला केलं असं सांगितलं. तेथील पत्रकारांनी गर्दीचे केलेले वार्तांकन यावेळी न्यायाधीशांना दाखवण्यात आलं.

हा गुन्हा होत नाही असं सांगत उच्च न्यायालाच्या ३५४ प्रकरणातील दोन निकालांचाही यात आव्हाड यांच्या वकिलांनी उल्लेख केला. राज्यात सत्ताबदल झाला आहे. त्याच्या बातम्या येत असतात, त्यांचं हे प्रतिबिंब आहे. त्याचा परिणाम जितेंद्र आव्हाड यांना सहन करावा लागला असा युक्तीवाद आव्हाड यांच्या वकिलांनी केला.

नेमका प्रकार काय झाला?

रिदा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले गेले. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले. असे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर त्या परिमंडळ एकचे उपायुक्तांना भेटल्या आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आव्हाड यांना एका प्रेक्षकास मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मुंब्रा बाह्यवळण, मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचे टायर जाळून रास्तारोको केला. आव्हाड़ यांनी वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.

रिदा रशीद या कोण आहेत?

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करणाऱ्या रिदा रशीद या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा आहेत. त्या मुंब्रा परिसरात राहत असून यापूर्वी त्या मुंबईतील अंधेरी येथील लोखंडवाला भागात राहत होत्या. त्यांचे पती अजगर रशीद यांची खासगी कंपनी असून त्याचे कार्यालय मुंबईत आहे. रिदा रशीद या मुंब्रा परिसरात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे काम करीत आहेत. त्या २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कळवा-मुंब्रा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली आणि ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेली. या मतदारसंघात शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.

Story img Loader