धार्मिक उत्सवांकरता रस्त्यावर मंडप टाकून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाने रस्त्यावर मंडप उभारणी करून ध्वनिप्रदूषण करण्यास मनाई केली असतानाच ठाण्यातील राष्ट्रवादीने मात्र रस्त्यावरच उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते अडवून, मंडप टाकून डीजेच्या दणदणाटात उत्सव साजरे करण्याची आडमुठी भूमिका ठाण्यातील राष्ट्रवादीने घेतल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होण्याची शक्यता आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या रोषालाही सामोरे जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात ‘रस्ते अडवा, उत्सव साजरे करा’ अशी उत्सवाची नवीनच परंपरा रुजू लागली आहे. ही नियमबाह्य़ संस्कृती जोपासण्यात राजकीय पुढाऱ्यांच्या छत्रछायेखाली असलेली मंडळेच आघाडीवर असल्याचेही यापूर्वीच उघड झाले आहे. रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सवाचे मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात येते. मात्र, त्याहून अधिक जागेवर अनेक मंडळांकडून मंडप उभारण्यात येतात. अशा मंडळांकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन होत असतानाही महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात. त्यामुळे दर वर्षी मंडळांकडून उत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांची वाट अडवली जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. असे असतानाच उच्च न्यायालयाने धार्मिक उत्सवाकरिता रस्त्यावर मंडप उभारण्यास तसेच
त्यानिमित्ताने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर र्निबध आणले आहेत. त्यामुळे उत्सवांच्या नावाखाली रस्ते अडविणे आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांना उच्च न्यायालयाचे आदेश जाचक वाटू लागला असून त्याविरोधात आता मतांच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेऊ लागले आहेत. याच पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शहरातील रस्ते अडवून आणि डीजेच्या दणदणाटात उत्सव साजरे करण्याची भूमिका जाहिर केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या भूमिकेचे समर्थन करताना मुल्ला यांनी न्यायालयाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शहरातील नियोजन अभावामुळे मैदाने शिल्लक राहिलेली नसल्यामुळे रस्त्यांवर उत्सव साजरे करावे लागत असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले.
आचारसंहितेलाही विरोध
ठाणे महापालिकेने उत्सवांसाठी सुधारित नियमावली तयार केली असून त्यानुसार रस्त्याच्या एकचतुर्थाश भागात मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, ही नियमावली जाचक असून इतक्या जागेवर मंडप उभारणे शक्य होणार नाही, असा दावा करीत नजीब मुल्ला यांनी नव्या नियमावलीस विरोध दर्शविला आहे. तसेच शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या भेटीगाठी घेऊन उत्सव पूर्वीप्रमाणेच साजरे करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि लोकहिताचा निर्णय असल्याने त्याविषयी नागरिकांनाही समजावून सांगितले पाहिजे. यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये.
– महेश बेडेकर, याचिकाकर्ते.