ठाण्यापल्याडच्या रेल्वे वाहतुकीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाबरोबरच इतरही काही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यापैकीच दोन म्हणजे ठाकुर्ली टर्मिनस आणि कल्याण सीबीडी..
ठाण्यापल्याडच्या प्रवाशांसाठी दर दिवशीचा रेल्वे प्रवास म्हणजे नरकयातना! त्यात हा प्रवासी कळवा, दिवा, मुंब्रा या स्थानकांवर राहत असेल, तर त्याचे हाल कुत्रेही खात नाही. सकाळच्या वेळी या स्थानकांवरून गाडी पकडणे दिवसेंदिवस अशक्य बनत चालले आहे. या भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी आता दिवा स्थानकाची पुनर्रचना करण्यात येणार असली, तरी तोदेखील अल्प काळासाठीचा उपाय ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या समस्येवर दीर्घकालीन तोडगा म्हणून यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी घोषित केलेल्या ‘सॅटेलाइट टर्मिनल’चा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. अशा प्रकारचे एक टर्मिनस मध्य रेल्वेने ठाकुर्ली येथे प्रस्तावित केले आहे. हे ठाकुर्ली टर्मिनस कार्यान्वित झाल्यास बहुतांश मेल-एक्स्प्रेस गाडय़ा मुंबईच्या वेशीवर थांबवून तेथूनच आपापल्या गंतव्यस्थानी धाडता येतील. त्यामुळे इतर वेळी मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी अडणारा रेल्वेमार्ग फक्त आणि फक्त लोकल गाडय़ांसाठीच वापरता येईल.
सध्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम जोरात सुरू आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यावर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. मात्र ठाकुर्ली टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यास या दोन मार्गिकाही उपनगरीय प्रवासासाठी उपलब्ध होऊ शकतात. ठाकुर्ली टर्मिनससाठी रेल्वेकडे जागा उपलब्ध असून, कल्याणजवळ स्टेबलिंग लाइनची कमी नसल्याने हा पर्याय रेल्वे मंत्रालयाला चाचपडून बघता येईल.
दरम्यान, राज्य सरकारने कल्याण भाग ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’ म्हणून विकसित करण्याचे धोरण घेतल्यास ठाण्यापल्याडच्या लाखो प्रवाशांना कल्याणमध्येच रोजगार उपलब्ध होऊ शकेल. कल्याण हे कर्जत व कसारा या दोन्ही मार्गाशी जोडलेले स्थानक आहे. त्याचबरोबर यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात कल्याण-वाशी मार्गासाठी आवश्यक अशा कळवा-ऐरोली मार्गिकेची घोषणाही करण्यात आली आहे. परिणामी कल्याण ऐरोलीमार्गे व कर्जतमार्गेही पनवेलशी जोडले जाईल. त्यामुळे सध्या केवळ मुंबईकडे सुरू असलेला प्रवाशांचा ओघ कल्याणपर्यंत सीमित राहू शकेल. अशा विकासासाठी कल्याणमध्ये सध्या जागाही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नव्या मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार करताही कल्याण येथील ‘सीबीडी’ विकास योग्य आहे. हा भाग एकदा सीबीडी म्हणून विकसित झाल्यावर येथे शहरांतर्गत वाहतुकीसाठी मेट्रो सेवा सुरू करणेही सोपे जाईल. परिणामी एकटय़ा मुंबईवर पडणारा भारही कमी होऊ शकेल.
या योजनेला अनेक सेवाभावी संस्थांचा पाठिंबा असला, तरी सरकारची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. पण रेल्वेला असलेल्या निधीच्या आणि जागेच्या मर्यादांचा विचार केल्यास हे दोन पर्याय ठाण्यापल्याडच्या प्रवाशांसाठी दीर्घकालीन उपाय ठरणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2015 रोजी प्रकाशित
वाहतुकीचा रेड सिग्नल :ठाकुर्ली टर्मिनस आणि कल्याण सीबीडी!
ठाण्यापल्याडच्या रेल्वे वाहतुकीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाबरोबरच इतरही काही गोष्टी गरजेच्या आहेत.
First published on: 31-03-2015 at 12:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need of thakurli terminus and kalyan cbd