प्रा. जितेंद्र भामरे, अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद
कल्याण-डोंबिवली शहरांच्या विकासाचे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. ऐतिहासिक काळातील कल्याण व आजचे कल्याण यात मोठा फरक जाणवतो. प्राचीन काळातील सातवाहन, चालुक्य, शिलाहार या राजवटींनी तसेच मध्ययुगीन काळातील आदिलशाही, मराठे व मुघल या राजवटींनी कल्याणमध्ये राज्य निर्माण केले. या सर्वाच्याच काळात कल्याणमध्ये अनेक सुधारणा झाल्या. सरकारवाडा, सुभेदारवाडा, काळा तलाव, काळी मशिद, शिशमहल, बगीचे, पोखरण, विविध मंदिरे यांची निर्मिती झाली. पाण्याची कमतरता कल्याणकरांना कधीच जाणवत नव्हती. कल्याण समृद्ध शहर म्हणून सर्वाना सुपरिचित होते. ऐतिहासिक कल्याण म्हणायचे व दुसरीकडे या ऐतिहासिक खाणाखुणा जपण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत, असे दुटप्पी धोरण प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून राबविले जात आहे.
या शहराला मंत्री, राजकीय नेते लाभले. त्यांनीही कधी या शहराचे ऐतिहासिकपण जपून ठेवावे म्हणून शासन पातळीवर प्रयत्न केले नाहीत. कल्याणमध्ये इतिहासाच्या खुणा उरल्या आहेत. त्या जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पारनाक्याजवळील सरकारवाडा छत्रपती शिवाजी, मुघल, पेशवे काळात राज्य कारभाराचे केंद्र होता, त्याची दुरवस्था झाली आहे. पोखरण तलावाचे सुशोभीकरण रखडले आहे. मध्ययुगीन काळात जुन्या कल्याणला तटबंदी होती. या तटबंदीचा काही भाग लाल चौकीजवळ आहे. हा बुरूज जतन करणे, त्याचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. कल्याणच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या अनेक वस्तू इतस्तत: विखुरलेल्या आहेत. या वस्तू एकत्र करून कल्याणमध्ये चांगले वस्तुसंग्रहालय उभे राहू शकते. ही मागणी दोन वर्षांपूर्वी कोकण इतिहास परिषदेच्या कल्याण शाखेने महापालिकेकडे केली होती. त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.
भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, लोकमान्य टिळकांचे जवळचे अनुयायी व इतिहास संशोधक चिंतामण विनायक उर्फ भारताचार्य वैद्य, रावबहादूर साने ही मंडळी कल्याणकरांच्या विस्मृतीत गेली आहेत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार भाऊ साठे आजही शिल्पकलेसाठी हिरिरीने काम करताना दिसतात. स्वातंत्र्य चळवळीत कल्याणमधील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली कामगिरी स्पृहणीय आहे. या सर्वाना न्याय मिळवून देणारे स्मारक कल्याणला होणे आवश्यक आहे. हे विकासाचे प्रकल्प कल्याणमध्ये केले तर शहर पर्यटनाचे ठिकाण होऊ शकते. त्यामुळे राज्य व राष्ट्रीयस्तरावर कल्याणची नव्याने ओळख निर्माण होऊ शकते.
सरकारने स्मार्ट सिटी योजनेत कल्याणची निवड केली. पालिका निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी गटारे, जलवाहिन्या, पदपथ, गल्लीतील रस्ते यांवरच लक्ष केंद्रीत करू नये. कल्याणला गतवैभव कसे प्राप्त करुन देता येईल, आपल्या शहराला पर्यटन क्षेत्र कसे बनवता येईल याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to maintain historical place in kalyan city
First published on: 22-09-2015 at 00:07 IST