प्रत्येक घरातील लेकीला शिक्षण मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपले जीवन वेचले. समाजाकडून झालेली अवहेलना झेलूनही त्यांनी आपले कार्य थांबविले नाही. आता समाज पुढारलेला असला तरी खेडय़ापाडय़ांमध्ये अनेक मुली शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंच्या विचारांची पुन्हा एकदा जनजागृती करण्याची गरज असून त्यासाठी येथील ज्ञानदीप स्त्री जागृती मंचाच्या कलापथकाने पुढाकार घेतला आहे. या मंचाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गीत जागर हा कार्यक्रम नुकताच सादर केला.
संयुक्त महिला मंडळ यांच्या वतीने मातृमंदिर सभागृहात रविवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गीत जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीनिमित्त किंवा अन्य काही कारणानिमित्त महिला मुंबईत येतात. ज्यांना येथे कोणताही आसरा नसतो, ते शहरातील मातृमंदिरमध्ये राहतात. समाजात प्रगती झाली परंतु महिलांवरील अत्याचार काही कमी झालेले नाहीत. फक्त त्यांचे स्वरूप बदलले आहे. खेडय़ापाडय़ांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. येथील मुली आजही शिक्षणापासून वंचित आहेत. या मुलींपर्यंत लोकगीताच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम मंचच्या वतीने करण्यात येत असल्याचे भारती मोरे यांनी सांगितले.
लोकगीताच्या बाजाची गाणी या कार्यक्रमात असून सावित्रीबाईंचे विचार व संदेश यातून दिले गेले. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, अनेक समस्यांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव यातील रचनांमधून शब्दबद्ध केले आहेत हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ होते. कार्यक्रमाची संकल्पना पारंपरिक असली तरी आधुनिक मूल्यांचा साज त्याला चढविल्याचे मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा आपटे यांनी दीपप्रज्वलनाने केली. त्यानंतर प्रथम सावित्रीबाईंना त्यांच्या ओव्यांतून वंदन करण्यात आले. वसुधा सरदार यांनी पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला या गीताने झाली. त्यानंतर ज्योती म्हापसेकर यांचे ‘शिक्षणाची गाडी चालली’ हे गीत सादर झाले. तसेच ‘हुंडा नको ग बाई’ हे भारुड व भारती मोरे यांचा ‘जोडीदार कसा असावा’ यावर आधारित फटका हे लोकगीत तसेच कमला बसीन, वसुधा सरदार यांचीही गीते या वेळी सादर करण्यात आली. समतेची आरती सादर करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.