प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या हालचाली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ‘लाइट रेल ट्रान्सीट’ (एलआरटी) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाच आता मुंब्रा, कळवा, दिवा या ठाण्याच्या उपनगरांसाठीही अंतर्गत सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘एलआरटी’पेक्षाही कमी खर्चात पूर्ण होणारी ‘नियो मेट्रो’ यंत्रणा या उपनगरांत राबवता येईल, असा अहवाल पालिकेकडे आला असून त्याआधारे नव्या वर्षांत प्रकल्प आराखडा तयार करण्याचे नियोजन आखले जात आहे.

ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने अंतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती. मात्र, केंद्र शासनाने अंतर्गत मेट्रोऐवजी ‘एलआरटी’ प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळून ‘एलआरटी’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पास सर्वसाधारण सभेनेही नुकतीच मान्यता दिली आहे. याच धर्तीवर कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांतही सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील नागरिकांना प्रवासासाठी मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांवर अवलंबून राहावे लागते. करोनाकाळात लोकल गाडय़ांमध्ये प्रवासाची मुभा नसल्यामुळे या प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन या तिन्ही उपनगरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वसाधारण सभेतही करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता या भागातही अशाच प्रकारची अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एलआरटीपेक्षा कमी खर्चीक असलेल्या नियो मेट्रोचा विचार केला जात आहे.

‘नियो मेट्रो’ हा प्रकल्प एलआरटीपेक्षा कमी खर्चीक आहे. एलआरटीपेक्षा नियो मेट्रोच्या डब्यांची प्रवासी क्षमता कमी आहे. कळवा-पारसिक मुख्य रस्ता, मुंब्रा ते शिळ रस्ता आणि म्हातार्डी असा या मेट्रोचा मार्ग होऊ शकतो, असे महामेट्रोने यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे. काही ठिकाणी जमिनीवरून तर काही ठिकाणी उड्डाणपुलावरून या मेट्रोचा मार्ग आखता येऊ शकतो. हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचे महामेट्रोने यापूर्वीच स्पष्ट केले असून त्याआधारे नव्या वर्षांत या प्रकल्पाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या वृत्तास महापालिकेचे उपनगर अभियंता प्रवीण पापळकर यांनी दुजोरा दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neo metro project in kalwa diva zws
First published on: 01-01-2021 at 02:17 IST