सविस्तर अहवाल सादर करण्याचे रस्ते विकास महामंडळाला आदेश
महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर शीव-पनवेल महामार्गावर वाशी येथील खाडीवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जात असतानाच, आता या ठिकाणी आणखी एक खाडीपूल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शीव-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, विद्यमान पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या गोष्टींचा विचार करून वाशी खाडीवर तिसरा पूल उभारण्याचा निर्णय झाल्याचे समजते. या पुलाच्या बांधकामासाठी सुसाध्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले आहेत.
वाशी खाडी येथे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा आणखी एक पूल उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची उभारणी करावी, अशा स्वरूपाची चर्चाही सुरू होती. ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीतही या पुलाच्या बांधणीवर चर्चा करण्यात आली. मात्र, वर्ष उलटूनही या पुलासंबंधी साधा कागदही हलला नव्हता. सावित्री पुलाच्या दुघटनेनंतर सरकारी यंत्रणांची तारांबळ उडाली असून नव्या पुलाच्या उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
मुंबई व नवी मुंबईला जोडणारा शीव-पनवेल महामार्ग पुणे, कोकणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाची तीन-चार वर्षांपूर्वी २२ किमी अंतराच्या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, दोन्ही बाजूने महामार्ग रुंदावला असला तरी उड्डाणपूल अद्याप अरुंद असल्याने महामार्गावरील कोंडी दूर झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुलाच्या उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीपुढे तातडीने ठेवण्यात येणार आहे. यासाठी सुसाध्यता अभ्यास आणि कामाच्या अंमलबजावणीचे अधिकारही देण्यात आले आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळाने नव्या पुलाच्या बांधणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून या पुलाची निकड लक्षात घेऊन लवकरात लवकर हा अहवाल मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
एकनाथ शिंदे, सावजनिक बांधकाममंत्री

कोंडीचा पूल
* वाशी खाडीवर १९७० ते ७५ या कालावधीत पहिला पूल उभारण्यात आला. हा खाडी पूल कमकुवत होत असल्याचे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने १९०० ते १९९५ दरम्यान त्यालगतच दुसऱ्या खाडी पुलाची उभारणी केली.
* बांधकाम विभागाने त्या वेळी केलेल्या सर्वेक्षणात या पुलावरून दररोज सरासरी १२५०० एवढय़ा संख्येने वाहनांची ये-जा असेल असे गृहीत धरण्यात आले. प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांत या सहा पदरी उड्डाणपुलावरून दररोज सरासरी एक लाख ७५ हजार एवढय़ा प्रचंड संख्येने वाहनांची ये-जा सुरू झाली असून त्यामुळे हा पूल वाहनकोंडीचे आगार बनला आहे.