अनेक गृहसंकुलांपैकी एक म्हणजे न्यू रचना पार्क. अतिशय वैशिष्टयपूर्ण इमारतींमुळे हे संकुल बघताक्षणीच डोळ्यात भरते. ११ हजार चौरस फूट जागेतील संकुलातील बहुतेक कुटुंबे महाराष्ट्रीय आहेत.
‘न्यू रचना पार्क’, मनोरमानगर, कोलशेत रोड, ठाणे (प.)
ठाणे स्थानकापासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर न्यू रचना पार्क हे संकुल आहे. कोलशेत आणि मानपाडय़ाच्या मधोमध हा भाग आहे. या संकुलात एकूण नऊ इमारती आहेत. त्यात सात मजल्याचे दोन टॉवर व इतर इमारती तीन मजल्याच्या आहेत. इथे एकूण २१४ सदनिका तर २५ व्यावसायिक गाळे आहेत. लोकवस्ती साधारण हजारएक असून बहुतेक कुटुंबे मराठी आहेत.
संकुलाच्या बाहेर पडल्याक्षणी टीएमटीचा बस थांबा आहे. तसेच ठाणे स्थानक गाठण्यासाठी शेअर आणि मीटरच्या रिक्षांचीही सोय आहे. याव्यतिरिक्त मुंबईत जाण्यासाठी काही अंतरावर बेस्टच्या बस गाडय़ांची सोय आहे. त्यामुळे इतर ठिकाणी वाहतुकीची असलेली जटिल समस्या येथील रहिवाशांना भेडसावत नाही. संकुलाच्या बाहेरील रस्त्यावर दुकाने तसेच दोन ते चार किलोमीटर अंतरावर डी-मार्ट, आर मॉल, सिनेमागृहे, बँका, नाटय़गृहे, कलाभवन इत्यादी सुविधा आहेत.
इमारतीतील अनेक रहिवासी फार वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा असे विविध सांस्कृतिक उत्सव येथे दरवर्षी साजरे केले जातात. त्यामुळे संकुलातील लहान मुलांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळते. संकुलातील रहिवाशांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी, जिव्हाळा आहे, असे अध्यक्ष राम ठोंबरे सांगतात. सचिव- दिलीप ठोंबरे, खजिनदार शरद श्रृंगारपुरे, सदस्य सुनील बेंदाळे, अमित पवार, संजय कवडे आणि समितीतील इतर सदस्य संकुलातील रहिवाशांची मदत घेऊन कार्यक्रम करीत असतात.
आरोग्य शिबीर
संकुलातील प्रत्येकाचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी येथे नियमित आरोग्य शिबीर आयोजित केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून दररोज सकाळी ७ ते ८ यावेळेत योगाचे प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी संकुल व्यवस्थापन घेते. सरकाने सुरू केलेल्या अभय योजनेचा लाभही या संकुलाने घेतला आहे. या योजनेचा पाठपुरावा करून प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. हे कामही अंतिम टप्प्यात आहे.
सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही
इमारतीच्या प्रवेशद्वाराशेजारीच पोलीस चौकी असली तरी संकुलाच्या वतीनेही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. इमारतीला दोन मुख्य प्रवेशद्वार असून प्रत्येक प्रवेशद्वारावर १२-१२ तासांच्या अंतराने दोन दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात. याव्यतिरिक्त संकुल परिसरात एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच चारही बाजूंनी आठ फुटी बांधकाम असलेली भिंत उभारण्यात आली आहे.
कचराकुंडीची समस्या
इमारतीच्या बाहेरील रस्त्यावर कचराकुंडी आहे. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठलेला असतो. येथील कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या वतीने घंटागाडी येत असली तरी दिवसभरात येथे मोठय़ा प्रमाणात कचरा साचतो. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील कचराकुंडी येथून दुसरीकडे हलविण्यात यावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.
पदपथांवर फेरीवाले
मनोरमानगर येथील रस्ता काही वर्षांपूर्वीच बनविण्यात आला आहे. अनेक पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. येथील टीएमटीच्या बस थांब्यावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मोठय़ा प्रमाणात या फेरीवाल्यांकडून रस्ता व्यापण्यात येतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दररोज थोडय़ाफार प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच हा भाग गर्दीचा असल्याने या कोंडीमुळे सामान्यांना चालणेही कठीण झाले आहे.
पर्यावरणपूरक संकुल
संकुलात मोठय़ा प्रमाणात वृक्ष आहेत. काही वर्षांपूर्वी संकुलातील रहिवाशांनी एकत्र मिळून आणखी १०५ वृक्षांची लागवड केली. त्यामुळे येथे प्रदूषण फारच कमी प्रमाणात आहे. वृक्षांची संख्या फार मोठय़ा प्रमाणात असल्याने झाडांच्या मोठमोठाल्या झावळ्या खाली पडत असतात. काही ठिकाणी त्या झावळ्या जाळल्या जातात. त्यातून प्रदूषण होते. महापालिकेने कोपरीत कचरा निर्मूलन प्रकल्प सुरू केला आहे. त्यात या झावळ्यांपासून खत निर्मिती होऊ शकेल. पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाशी या संदर्भात आम्ही पत्र व्यवहार केला आहे. जर पालिकेने यावर उपाय सुचवला तर ठाण्यातील प्रदूषणाला आळा बसू शकतो असे श्रृंगारपुरे यांनी सांगितले.