शहरापासून काही मैलांवर असूनही शहरापेक्षा पूर्णपणे उलट परिस्थिती, गावात पुस्तक मिळण्याची सुतराम शक्यता नाही, त्यातही वृत्तपत्राचा तितकासा संबंध नाही, अशी काहीशी परिस्थिती बदलापूरपासून जवळच असलेल्या कुडेरान या गावची आहे. मात्र बदलापुरातील आदर्श महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट क्लबने ‘गो व्हिलेज’ हा प्रकल्प हाती घेतला. त्यातून त्यांनी गावात एका सार्वजनिक ग्रंथालय आणि वृत्तपत्र वाचनालय सुरू केले आहे. ग्रामीण भागातही शहरी सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आदर्श महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट क्लबने कुडेरान गावात ‘गो व्हिलेज’ हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत विनामूल्य सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले. शाळा जिल्हा परिषदेची असली तरी त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा या हेतूने क्लबच्या वतीने गावात एक सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले. यात त्यांना कुडेरानच्या जिल्हा परिषद शाळेचाही हातभार लागला. आज लहान मुलांच्या साहित्यासोबतच इतर प्रकारची पुस्तकेही येथे उपलब्ध आहेत. पुस्तकांसोबतच अनेकदा क्लबच्या वतीने गावकऱ्यांना विविध विषयांवरील चित्रपटही दाखवण्यात आले. अनेक विषय आणि प्रश्न अपुऱ्या माहितीमुळे ग्रामस्थांना भेडसावत असत. त्यासाठी त्या विषयांवर मार्गदर्शन शिबिरे गेल्या तीन वर्षांत आयोजित केली गेली. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला ‘गो व्हिलेज’ प्रकल्प आता संपला आहे. मात्र या तीन वर्षांच्या काळात क्लबने टप्प्याटप्प्याने विविध कामे केली. मग यात ग्रामस्वच्छतेचे काम असो की, ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर. गावकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना औषधांचे वाटपही करण्यात आले. गावकऱ्यांच्या माहितीसाठी बस स्थानकात बसचे वेळापत्रही लावण्यात आले. यामुळे फक्त त्यांनाच बसची वेळ कळत नाही तर बसचालकांनाही वेळेचा जाब विचारला जाऊ लागला आहे. कुडेरानमध्ये आता अस्तित्वात असलेल्या ग्रंथालयामुळे आणि वृत्तपत्र वाचनालयामुळे गावकरी आणि विद्यार्थी आता राहतात. ‘गो व्हिलेज’ प्रकल्पांतर्गत घेतल्या गेलेल्या स्पर्धामुळे अनेक गावकरी आणि विद्यार्थ्यांना आता आपल्या कलागुणांची ओळख झाली आहे. त्यामुळे कुडेरानसारख्या गावात आता खऱ्या अर्थाने बौद्धिक पेरणीला सुरुवात झाली आहे. गावांचे रूप पालटणार असेल, तर असेच प्रकल्प वेगवेगळ्या गावांत राबवण्याचा मानस विलास कडाळी यांनी व्यक्त केला आहे.