ग्रीसमध्ये अडकलेल्या ठाण्यातील युवकाच्या आईची भावना
कल्पेशला जहाजाचे कॅप्टन होण्याची इच्छा होती आणि त्यासाठीच त्याने हे क्षेत्र निवडले होते. मात्र, परदेशात जहाजावर नोकरी करण्याचा त्याचा निर्णय आम्हाला पटला नव्हता. त्यामुळे आम्ही त्याला ग्रीसला जाण्यापुर्वी रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या जिद्दीपुढे आम्ही हात टेकले होतो, अशी हतबलता त्याची आई पल्लवी शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केली. आमचा विरोध असला तरी त्याची इच्छा पुर्ण झाली असती तर आम्हाला समाधान वाटले असते, पण तो खोटय़ा आरोपाखाली ग्रीसमध्ये अडकल्याचे दुख वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच गेली सात महिने तो ग्रीसमध्ये अडकला असतानाही देशातील एकाही सरकारी यंत्रणेकडून अद्याप मदत मिळू शकलेली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मित्रांसोबत तो कोकणात बोटीवर जायचा आणि इथेच त्याला जहाजात काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे दहावीपासूनच तो जहाजावर काम करण्याची इच्छा वारंवार व्यक्त करीत होता, असेही पल्लवी शिंदे यांनी सांगितले. जहाजाचे कॅप्टन होण्याची त्याची मनोमन इच्छा होती आणि त्यासाठीच त्याने हे क्षेत्र निवडले होते, असेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील एका खासगी संस्थेमार्फत त्याने ग्रीसमध्ये नोकरी मिळवली. या नोकरीमधून त्याला ४०० डॉलर इतका पगार मिळणार होता. सुरूवातीचे दोन महिने त्याला पगार मिळाला आणि तिसऱ्या महिन्यात हा प्रकार घडला. त्याच्या शिक्षणासाठी कर्ज काढले असल्यामुळे त्याने पगाराचे पैसे पाठविले होते आणि आम्हाला कर्जाची रक्कम फेडण्यास सांगितली होती, अशी माहिती त्याचे वडील राजेंद्र यांनी दिली.
घरची परिस्थिती बेताची
ठाणे येथील वृंदावन परिसरात कल्पेशचे आईवडील एका छोटय़ा खोलीत राहतात. त्याचे वडील राजेंद्र हे पेट्रोल पंपावर तर आई पल्लवी शिवणकाम करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही कर्ज काढून त्यांनी कल्पेशचे शिक्षण पुर्ण केले.
सरकारची मदत नाही!
कल्पेश जहाजावर नोकरी करण्यासाठी जून २०१५ मध्ये ग्रीसला रवाना झाला. दोन महिन्यांनंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ग्रीसमध्ये जहाजातल्या कंटेनरमध्ये मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आणि याप्रकरणात जहाजाच्या कॅप्टनसह सात जणांना अटक झाली. या सातजणांमध्ये कल्पेशचाही समावेश आहे. गेली सात महिने तो कैदेत आहेत, मात्र त्याच्या सुटकेसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांना दोनदा पत्र्यव्यवहार केला, मात्र, त्या पत्र्यव्यवहाराबाबत अद्यापही कोणतीच विचारणा झालेली नाही, अशी खंत कल्पेशच्या आईवडीलांनी व्यक्त केली.



