बदलापूर नगरपालिकेच्या ४७ प्रभागांत होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार ताटकळले आहेत. आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक केंद्रावर एकच झुंबड उडण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता सोमवारी उमेदवारांची व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी उसळली. यात भाजपचे उमेदवार आघाडीवर होते, तर शिवसेनेचेही काही उमेदवार अर्ज भरण्यासाठी आले होते. असे असले तरी यापैकी बहुतांश उमेदवारांना पक्षाने अद्याप अधिकृत अर्ज देऊ केलेले नाहीत. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दिवसभरात जवळपास ३८ उमेदवारांनी अर्ज भरले. भाजपच्या उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अजून युती होणार की नाही याची घोषणा झाली नसल्याने पक्षाचे एबी फॉर्म कोणत्याच उमेदवाराकडे नव्हते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेले उमेदवार सध्या तरी अपक्षच म्हणून नोंदीत आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. या सर्व उमेदवारांना पक्षातर्फे मंगळवारी सकाळी एबी फॉर्म मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी धावपळ करत एबी फॉर्म या उमेदवारांना भरावे लागणार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत पक्षांनी निर्णय न घेण्यामागे बंडखोरी टाळणे हादेखील उद्देश असल्याचे समजते. त्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणूनदेखील अर्ज भरून ठेवले आहेत.
मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे. ही गर्दी हाताळण्यासाठी बदलापूर पालिका उमेदवारांना प्रवेशद्वारात अर्ज भरण्यासाठी टोकन देणार आहे. तसेच उमेदवारांना अर्ज भरणे सोपे जावे यासाठी अंबरनाथ व बदलापूर पालिकांनी अर्ज भरण्याची मदत केंद्रेदेखील सुरू केली आहेत. यंदा ऑनलाइन अर्ज भरावयाचा असून उमेदवारांना एखाद्या बँकेत स्वतंत्र खातेदेखील उघडावे लागणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील वाढली आहे. सुरेक्षेच्या दृष्टिकोनातून या पालिकांच्या शंभर मीटरच्या परिसरात ठाणे पोलीस आयुक्तांकडून १४४ कलम लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येथे वाहनांना बंदी असून उमेदवारासोबत चारच जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.