गुरुवारमुळे एक दिवस आधीच दरवाढ ; चिकन ३० तर मटण ६० रुपयांनी महाग
नववर्षांच्या स्वागतासाठी मद्याचे प्याले रिचवण्यासोबतच मांसाहारी पदार्थाची लज्जत चाखण्याचे प्रमाण भरपूर आहे. यंदा ‘थर्टीफर्स्ट’ गुरुवारी आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी त्याची भरपाई म्हणून बुधवारी चिकन-मटणच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी दिसत होती. परिणामी ३१ डिसेंबरच्या एक दिवस आधीच चिकन किलोमागे ३० रुपयांनी तर मटण ६० रुपयांनी वाढले आहे. डोंबिवलीत तर चिकनचे दर किलोमागे ५० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले आहे. चिकन-मटण दुकानांतील ही महागाई आज, ३१ डिसेंबरला हॉटेलांमध्येही दिसून येईल, अशी शक्यता आहे.
सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्ष स्वागतानिमित्ताने दरवर्षी विविध ठिकाणी पाटर्य़ा आयोजित करण्यात येतात. अशा पाटर्य़ामध्ये मांसाहारी पदार्थाना मोठी मागणी असल्याने दरवर्षी चिकन आणि मटणचे भाव वाढतात. यंदाही तो कल कायम आहे. मात्र, ‘थर्टी फर्स्ट’ गुरुवारी येत असल्याने त्या वारी मांसाहार वज्र्य असणाऱ्यांची निराशा झाली. यामुळे अनेकांनी बुधवारीच सामिष मेजवान्या आयोजित केल्या आहेत. त्यामुळे बुधवारी चिकन, मटणची मागणी वाढली. याचा फायदा घेत विक्रेत्यांनीही दरांत एक दिवस आधीच वाढ केली.
दुसरीकडे, गुरुवारच्या ‘३१’चा फटका मांसाहारी पदार्थाच्या विक्रीवर होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. ‘दरवर्षी थर्टीफस्ट पाटर्य़ामध्ये मांसाहारी पदार्थाना मोठी मागणी असल्याने चिकन आणि मटणची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. परंतु, गुरुवारी अनेकजण मांसाहार करत नसल्याने त्यांनी थर्टीफर्स्टच्या पाटर्य़ा रद्द केल्या आहेत तर काही ठिकाणी मांसाहार वगळून पाटर्य़ा साजरे करण्याचे बेत आखले जात आहेत. परिणामी, यंदा चिकन आणि मटणच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे,’ असे ठाण्यातील एका मटणविक्रेत्याने सांगितले.
‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. मार्गशीर्ष महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत आणि त्यात नेमका थर्टीफर्स्टच्या दिवशी गुरुवार आला आहे. त्यामुळे मांसाहारी पदार्थाच्या मागणीत यंदा घट झाली आहे. तसेच चिकन आणि मटणचे दर नेहमीच कमी-जास्त होत असल्यामुळे मांसाहारी पदार्थाच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही,’ अशी माहिती ठाण्यातील मांसाहार पदार्थ विक्रेते खालीद मियाँ सय्यद यांनी दिली. तर काही जण रात्री बारा वाजल्यानंतरही बेत आखू शकतात, असे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीत चिकनही महाग
ठाणे, कल्याण तसेच आसपासच्या शहरांच्या तुलनेत डोंबिवली शहरामध्ये भाज्या महाग असल्याची ओरड नेहमी होत असते. मात्र, या शहरात चिकन व मटणाचे दरही आसपासच्या शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे उघड होत आहे. इतर शहरांच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीत चिकन आणि मटणचे भाव ३० ते ४० रुपयांनी जास्त आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चिकन, मटणाचे दर (कंसात पूर्वीचे दर)
प्रकार ठाणे डोंबिवली कल्याण
ब्रॉयलर (जिवंत) १३०(१००) १७०(१३०) १६०(१४०)
गावठी (जिवंत) २२०(१८०) २२०(१८०) २५०(२००)
मटण (किलो) ४४०(३८०) ४४०(३८०) ४४०(३८०)
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2015 रोजी प्रकाशित
सामिष ‘थर्टीफर्स्ट’ पूर्वसंध्येलाच महाग!
चिकन-मटण दुकानांतील ही महागाई आज, ३१ डिसेंबरला हॉटेलांमध्येही दिसून येईल, अशी शक्यता आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2015 at 03:15 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non vegetarian before 31st expensive