ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे प्रतिपादन; आगरी बोलीभाषेतील कवितांचे सादरीकरण
अलीकडे नवतरुण कवी चालत्याबोलत्या वातावरणाचे, समाजातील हालचालींचे मनोवेधक भाव टिपून त्या कवितेमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काव्याचा हा नवीन प्रकार कवितेला नवीन दिशा देणारा आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी रविवारी येथे केले.
कवी डॉ. अनिल रत्नाकर यांच्या ‘ब’ आणि ‘पाऊले’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन पालिकेच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. या वेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवी बाळ बेंडखळे, डॉ. प्रल्हाद देशपांडे उपस्थित होते. तरुण पिढी समाजमनाचा नवीन पद्धतीने धांडोळा घेऊन तो भाव आपल्या कवितेत उतरवत आहे. समाजमनाचे परखड विश्लेषण या कवितांमधून होत आहे. केशवसुत, कवी ग्रेस,महानोर यांच्यानंतर तिसरी पिढी कवितेच्या नव्या प्रवाहात सामील होत आहे, कवितेला नवी दिशा देत आहे. या प्रवाहात तरुणांचा सहभाग कौतुकास्पद आहे, असे म्हात्रे म्हणाले.
या कार्यक्रमानंतरच्या कवी संमेलनात गजानन पाटील, संदेश भोईर, सुनील पाटील, सुरेश मुकादम, सर्वेश तरे, ज्ञानेश्वर चिकणे, विनोद भरोडीकर, दीपक पारधे, जयंत पांचाळ, सुनील पवार, दीपक ओंबळे हे कवी सहभागी झाले होते. ‘यातील सच्चा माणूस’, ‘आज आमच्या ब ची विकेट परली, ‘आमची आजीस, डावा डोळा लवला’, ‘लग्न सोहळ्यातील उधळपट्टी’, ‘बाल्या पोरी बघते’, अशा आगरी समाजजीवनावर आधारलेल्या व आगरी बोलीभाषेतील कविता या वेळी कवींनी सादर केल्या.
या वेळी माजी आमदार रमेश पाटील, नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, अंकुश म्हात्रे, अशोक पाटील, सरपंच तकदीर काळण उपस्थित होते.