बदलापूरः कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवार, १७ नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आतापर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेसाठी सदस्यपदासाठी ८७ तर नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज सादर झाला. तर अंबरनाथ शहरात आतापर्यंत २७ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी येथे अद्याप एकही अर्ज सादर झाला नव्हता. त्यामुळे सोमवारी शेवटच्या दिवशी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या अ वर्ग नगरपालिकांसाठी दहा वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील ५९ जागांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत अंबरनाथ नगरपालिकेत अवघे २७ अर्ज दाखल झाले आहेत.
बहुतांश प्रभागांमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर नगराध्यक्ष पदासाठीही एक अर्ज आला नसल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सोमवारी अंबरनाथ नगरपालिकेतही अर्ज दाखल करण्यासाठी सर्वपक्षिय उमेदवार गर्दी करण्याची शक्यता आहे. येथे शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे जागावाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बदलापुरात शिवसेना विरूद्ध भाजप – राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी थेट लढत सध्या तरी दिसते आहे. महाविकास आघाडीत एकमत नसल्याने अद्याप त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. भाजप राष्ट्रवादी युतीच्या वतीने रविवारी रूचिता घोरपडे यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला. तर शहरात एकूण ८७ अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
सोमवारी शिवसेनेच्या वतीने वीणा म्हात्रे आपला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करतील. तर इतर पक्षाचे अधिकृत उमेदवारही अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काही प्रभागांमध्ये अद्याप एकही अर्ज न आल्याने आज उमेदवारांची बदलापुर पालिकेत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.
मंगळवारी छाननी सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेल. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी सुरू होईल. वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र २१ नोव्हेंबर नंतरच सर्व प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
